चंद्रपूर :- महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्प आणि 90 पेक्षा जास्त वाघांचे निवासस्थान असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मा. श्री. सुधीर मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र यांनी काल मुंबईत ताडोबा महोत्सव-2024 ची घोषणा केली. वनसंरक्षक आणि ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी आज चंद्रपूर येथे या महोत्सवाची सविस्तर माहिती दिली. दोनशेहून अधिक वाघांचा अधिवास असलेल्या आणि वाघांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरमधील विविध ठिकाणी 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत हा भव्य महोत्सव होणार आहे. ताडोबा महोत्सव आयोजित होत असतानाच माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधील त्यांच्या ताज्या भाषणात वन्यजीव संरक्षण आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी AI तंत्रज्ञान वापरल्याबद्दल ताडोबाचे कौतुक केले. “चंद्रपूर जिल्ह्यातील मानव आणि वाघ यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जात आहे,” असे माननीय पंतप्रधानांनी नमूद केले. “त्यांनी केलेली प्रशंसा ही वन्यजीव संवर्धनाप्रतीच्या आमच्या अतूट बांधिलकीचे कौतुक आहे”, असे डॉ. रामगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वन्यजीव सद्भावना दूत आणि चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन या उद्घाटन समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात वन्यजीव संवर्धनावर चर्चासत्र, स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा, छायाचित्रांचे प्रदर्शन, कवीसंमेलन आणि जागतिक कीर्तीच्या कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या महोत्सवात विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “ताडोबा महोत्सव शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. हा कार्यक्रम केवळ वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत नाही, तर वन्यजीवांबरोरबरच्या सहजीवनाची स्थानिक ग्रामस्थांची महत्वपूर्ण भूमिकादेखील अधोरेखित करतो. जबाबदार पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि सर्वांनी संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी करुन, आम्ही केवळ आमच्या मौल्यवान परिसंस्थांचेच रक्षण करत नाही, तर स्थानिकांसाठी आर्थिक प्रगतीच्या संधीही निर्माण करतो. एकत्रित प्रयत्नांमधून आपण एक निरामय वातावरण तयार करू शकतो, जिथे वन्यजीवांना संरक्षित निवासस्थान मिळेल आणि स्थानिक समुदायांचीही भरभराट होईल.” ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा स्थापना दिवसही ताडोबा महोत्सव दरम्यान साजरा केला जाणार आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1955 मध्ये झाली. तीन दशकांनंतर 1986 मध्ये अंधारी अभयारण्य घोषित करण्यात आले. पुढे 1995 मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली आणि वाघांना त्यांचे हक्काचे घर मिळाले. आज, सस्तन प्राण्यांच्या 80 प्रजाती आणि पक्ष्यांच्या 280 प्रजाती एकूण 1,727 चौरस किलोमीटर (यात 625 चौरस किलोमीटर कोर जंगल आहे) परिसरात पहायला मिळतात. ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो. वन विभाग ताडोबा महोत्सव-2024 दरम्यान जागतिक वन्यजीव दिन साजरा करत आहे. या अनुषंगाने वन्यजीव संरक्षणापुढील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी चर्चासत्रे आणि परिसंवाद आणि जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या