अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता ? (Is it possible that the state cabinet will be expanded tomorrow in the background of the budget session?)

Vidyanshnewslive
By -
0

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता ? (Is it possible that the state cabinet will be expanded tomorrow in the background of the budget session?)

मुंबई :- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे रखडलेला शिंदे सरकारचा उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २७ फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांच्याशी भेट घेणार असल्याची माहीती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे. या भेटीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात द्यावयाच्या भाषणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता असून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्याने राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच सुटल्यात जमा आहे. मात्र १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असूनही सर्वोच्च न्यायालयातील निकाल शिंदेंच्या बाजूने झुकला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या समोरील अडचणी काहीशा आता दुर झाल्या असून शिंदेंना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या २६ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचा विचार सुरू आहे. गेल्या सात ते आठ महिन्यापासून एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री धरून २० मंत्री कारभार पाहत आहेत. यातच आता दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाला किती खाती मिळणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. शिंदे गटाकडे ९ तर भाजपकडेही ९ खाती सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे पुढच्या विस्तारात अपक्ष आमदार, आणि महिलांचाही समावेश केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सत्ताधारी आमदार सोबत अनेक अपक्ष आमदाराचेही लक्ष लागले असून मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे लवकरच कळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)