Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

पाण्याची नासाडी रोखण्यासाठी ऐतिहासिक पाऊल, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांच्या तहानलेल्या जीवांसाठी सेन्सर यंत्रणेचा आधार (A historic step to curb water wastage: Tadoba-Andhari Tiger Reserve implements a sensor-based system for thirsty wildlife.)

पाण्याची नासाडी रोखण्यासाठी ऐतिहासिक पाऊल, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांच्या तहानलेल्या जीवांसाठी सेन्सर यंत्रणेचा आधार (A historic step to curb water wastage: Tadoba-Andhari Tiger Reserve implements a sensor-based system for thirsty wildlife.)

चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुमारे १३० नैसर्गिक जलस्रोत आणि ३५० कृत्रिम पाणवठे आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये या पाणवठ्यांचे महत्त्व अधिक वाढते. जंगलातील वाघ, बिबट्या, हरीण आणि इतर वन्यप्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता कायम ठेवणे हे वन व्यवस्थापनासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. या पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यासाठी अनेक ठिकाणी सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे, गेल्या उन्हाळ्यात तीव्र उष्णता असूनही या पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्यासाठी टँकरची आवश्यकता भासली नाही. जंगलातील उन्हाचा तडाखा, पाण्यासाठी वन्यजीवांची होणारी भटकंती आणि उन्हाळ्यात प्रत्येक थेंबाचे असलेले मोल लक्षात घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने वन्यजीवांच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जंगलातील पाणवठ्यांमध्ये पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवतानाच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी ताडोबात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर सेन्सर-आधारित स्वयंचलित यंत्रणा सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे वन्यजीवांची तहान भागविण्यासोबतच निसर्गातील अमूल्य जलसंपत्तीचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे. मात्र, सौरऊर्जेवर चालणारे पंप अनेकदा सतत सुरू राहत असल्याने पाणवठे भरल्यानंतरही पाण्याचा ओव्हरफ्लो होतो. हे पाणी काही वन्यप्राण्यांसाठी लोळण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरत असले, तरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता असते. पंप बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जावे लागते. जंगलात वन्यप्राण्यांच्या उपस्थितीमुळे अशा कामांमध्ये धोका निर्माण होऊ शकतो. या समस्येवर उपाय म्हणून आता स्वयंचलित सेन्सर यंत्रणेचा पर्याय पुढे आला आहे. या आधुनिक प्रणालीमध्ये पाण्याची पातळी मोजणारे सेन्सर, नियंत्रक आणि रिले यांचा वापर केला जाणार आहे. पाण्याची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा कमी झाल्यास पंप आपोआप सुरू होईल, तर पाणवठा आवश्यक पातळीपर्यंत भरल्यानंतर पंप आपोआप बंद होईल. त्यामुळे पाण्याचा अनावश्यक ओव्हरफ्लो रोखणे, पंपांचा विनाकारण वापर टाळणे आणि कर्मचाऱ्यांवरील सतत देखरेखीचा ताण कमी करणे शक्य होणार आहे. 
            ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने पाण्याचे समतोल वितरण सुनिश्चित करण्यासाठी कोअर क्षेत्राची विविध ग्रिडमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक ग्रिडमध्ये पाणवठे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असून, हे उद्दिष्ट याच वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे जंगलातील विविध भागांमध्ये वन्यजीवांना पाण्याची उपलब्धता करून देण्यास मदत होणार आहे. दुष्काळी परिस्थिती आणि भविष्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबतची अनिश्चितता लक्षात घेता, या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी मोलाचा ठरू शकतो. त्यामुळे जलस्रोतांचे संवर्धन, भूजलाचा अनावश्यक उपसा रोखणे आणि जंगलातील पाणवठ्यांचे प्रभावी व्यवस्थापन करणे ही काळाची गरज बनली आहे. जंगलातील मुक्या जीवांची तहान भागविण्यासाठी आणि निसर्गाचा अमूल्य ठेवा जपण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड देणारा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा हा उपक्रम वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे. वन्यजीवांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पाण्याचे संवर्धन किती आवश्यक आहे, याची जाणीव करून देणारे हे पाऊल ठरत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ला यांनी सांगितले की, वन्यजीवांच्या पाणवठ्यांच्या व्यवस्थापनासाठी सेन्सर-आधारित प्रणाली प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. या प्रणालीचा व्यापक वापर केल्यास जलसंवर्धनाला बळ मिळेल, दुष्काळी परिस्थितीतही वन्यजीवांसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यास मदत होईल आणि भूजल संवर्धनालाही हातभार लागेल. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या