Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

विनापरवाना डीजेचा दणदणाट अखेर बल्लारपूर पोलिसांनी रोखला; ७.३१ लाखांची यंत्रणा जप्त, मालक-ऑपरेटरवर गुन्हा (Ballarpur police finally put a stop to the blaring of an unauthorized DJ setup; equipment worth ₹7.31 lakh seized, and a case registered against the owner and operator.)

विनापरवाना डीजेचा दणदणाट अखेर बल्लारपूर पोलिसांनी रोखला; ७.३१ लाखांची यंत्रणा जप्त, मालक-ऑपरेटरवर गुन्हा (Ballarpur police finally put a stop to the blaring of an unauthorized DJ setup; equipment worth ₹7.31 lakh seized, and a case registered against the owner and operator.)

बल्लारपूर :- मोठ्या आवाजात डीजेचा दणदणाट सुरू करून नियमांना धाब्यावर बसविणाऱ्यांना बल्लारपूर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. विनापरवाना डीजे वादनाचा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल ७ लाख ३१ हजार रुपये किमतीची डीजे यंत्रणा जप्त केली. आवाजाच्या गोंगाटात नियमांचे भान विसरणाऱ्यांना या कारवाईने जोरदार चपराक बसली आहे. याप्रकरणी डीजे मालक आणि ऑपरेटरविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावरील विसापूर भिवकुंड परिसरात नुरानी ट्रान्सपोर्ट कार्यालयाजवळ मोठ्या आवाजात डीजे वाजत असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड यांनी पथकासह रात्री १०.४५ वाजता घटनास्थळी धाव घेतली. तेथे टाटा झेनॉन वाहनावर डीजे लावून मोठ्या आवाजात वादन सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी डीजे वाजविण्याचा परवाना मागितला, मात्र संबंधितांकडे कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी वेळ न दवडता कारवाई केली. डीजे मालक प्रवीण गिरीधर गेडाम (वय ३१), रा. कोठारी, ता. बल्लारपूर आणि डीजे ऑपरेटर प्रितसिंग राजनंदन पवार (वय २३), रा. पंडित दीनदयाळ वार्ड, बल्लारपूर यांच्याकडील डीजे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत बेस स्पीकर, टॉप स्पीकर, जनरेटर, मिक्सर मशीन, सब-वूफर, प्रोसेसर, लाईट आणि अन्य ध्वनियंत्रणा असा एकूण ७ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना होणारा संभाव्य त्रास आणि ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेता, विनापरवाना वादन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
           उत्सवाचा आनंद साजरा करताना नियमांचे पालन करणेही तितकेच आवश्यक आहे. मात्र, परवानगीशिवाय मोठ्या आवाजात डीजे वाजविण्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी थेट यंत्रणाच जप्त केली. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजविणाऱ्यांना आता कायद्याच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ व ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३८ व १३६ अन्वये कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड व बल्लारपूर पोलीस पथकाने ही कारवाई केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या