गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज ३ सप्टेंबरला पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून, त्याचे केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचे धक्के अहेरी तालुक्यातील अहेरी तसेच नागेपल्ली परिसरातही जाणवल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली. भूकंपानंतर प्रशासनाने विविध भागांतून नुकसानीची माहिती घेण्यास सुरुवात केली असून, प्राथमिक माहितीनुसार अद्याप कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. दरम्यान, या भूकंपाबाबत पर्यावरण व भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांनी भौगोलिक पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्यांच्या मते, सिरोंचा ते मुलपर्यंत गोदावरी व्हॅली फॉल्ट या निओटेक्टॉनिक फॉल्ट लाईनचा प्रभाव आहे. सिरोंचा परिसर गोदावरी खोऱ्यातील भूकंपप्रवण झोन-३ मध्ये येतो. या भागातील भूकंप हे इंट्राप्लेट प्रकारातील असून, साधारणतः २ ते ४ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे भूकंप कमी जोखमीचे मानले जातात.
मान्सूननंतर भूगर्भातील पाण्याची हालचाल आणि दाबातील बदलांमुळे जलभूकंपीयतेशी संबंधित भूकंप होऊ शकतात, असे प्रा. चोपने यांनी सांगितले. कोयना आणि कर्नाटक परिसरातील भूकंपांचा संदर्भ देत मोठी धरणे उभारण्यापूर्वी जलभूकंपीयतेचा सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भूकंपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत घाबरण्याचे कारण नसून नागरिकांनी शांतता राखावी आणि आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. तसेच भूकंपासंदर्भातील अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या