मोहर्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत गुर चारतांना भीषण घटना, वाघाच्या हल्ल्यात २५ वर्ष युवक ठार (Horrific incident in Moharli Forest Range while grazing cattle; 25-year-old youth killed in tiger attack.)
चंद्रपूर :- मोहर्ली वनपरिक्षेत्रातील मोहर्ली बिटाच्या कक्ष क्रमांक १५४ मध्ये वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. विजय मधुकर मेश्राम अंदाजे २५ वर्ष रा. जुनोना असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे जुनोना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय मेश्राम हे शनिवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मोहर्ली जंगलातील कक्ष क्रमांक १५४ मध्ये गुरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विजय यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाने दिली.
घटनेची माहिती मिळताच मोहर्ली (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेगावकर व त्यांचे पथक, मानद वन्यजीव रक्षक मुकेश भांदककर तसेच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला, तर वनविभागानेही घटनास्थळाचा पंचनामा नोंदविला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, वनविभागाकडून मृताच्या आई निरंजना मधुकर मेश्राम यांना घटनास्थळी तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. तसेच जुनोना गावातील नागरिकांना जंगल परिसरात जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाकडून सुरू आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या