अबब...! वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शाळकरी मूल पोहोचली थेट पोलीस ठाण्यात एसटी बस पास हरवला म्हणून FIR नोंदवून घेण्याची केली विनंती (Wow...! A school student from Hinganghat taluka in Wardha district went straight to the police station and requested that an FIR be registered because they had lost their ST bus pass.)
वर्धा :- शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात. तसेच पोलिसांपासून लांब असलेलेच बरे, असेही म्हटल्या जाते. म्हणून पोलीस तक्रार करण्यापेक्षा आपसात वाद निपटवून टाकू, अशी भावना दिसून येते. मोबाईल चोरी किंवा हरवल्याची तक्रार करावीच लागते. किंवा वस्तू गहाळ झाली की त्याची अधिकृत नोंद म्हणुन पोलिसांकडे फिर्याद होतेच. पण हे सर्व सज्ञान व्यक्तीच करतो. पण शाळकरी मुलं ठाण्यात दिसणार नाही. आता हा त्यास अपवाद. दोन शाळकरी मुलं पोलीस ठाण्याच्या पायरीवर पोहचले आणि पोलीस पण थक्क झाले. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील परडा या गावातल्या डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय या शाळेतील हे विद्यार्थी. या शाळेत ९ व्या वर्गात शिकणारा समर्थ अनिल महाकाळकर याचा बससेवेचा विद्यार्थी पास हरवला होता. त्याची अधिकृत पोलीस तक्रार झाल्याशिवाय त्यास दुसरा पास मिळणार नाही, असे सांगण्यात आले. तो घाबरला. करावे काय, असा प्रश्न पडला. शेवटी त्याने आपल्या वर्गमित्रास सोबत घेत हिंगणघाट पोलीस ठाणे गाठले. तेव्हा अंमलदार आष्टणकर यांनी तक्रार कशी द्यायची हे समजावून सांगितले. घाबरू नका, मी सांगतो तसे करा, असा धीर दिला. तक्रार झाल्यावर त्यास एसटी पास हरविल्याचा दाखला दिला. तसेच नवी पास कशी काढायची याची प्रक्रिया पण समजावून सांगितली. हे आटोपले तेव्हा दोघा चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. बस स्थानक प्रमुख संजय शेडमाके हे सांगतात की विद्यार्थी समर्थ याने पास हरवला असे सांगितले होते. तेव्हा त्यास पोलिसांना माहिती देण्याची सूचना करण्यात आली होती. १९८८ चे पास संदर्भातील परिपत्रक आहे. त्यानुसार विद्यार्थीच नव्हे तर आमच्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची पण पास हरवला तर त्यांनाही पोलीस तक्रार द्यावीच लागते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक म्हणतात की मुलांचे कौतुकच आहे. त्यांनी आपले संकट स्वतः पोलिसांना सांगितले. त्याचे त्वरित निराकरण करण्यात आले. नागरिकांनी सुद्धा न घाबरता आपली तक्रार दिली पाहिजे. समस्या दूर होण्यास मदत होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या