राज्यातील बोगस पत्रकारांवर अंकुश लावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा - पुरोगामी पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांना निवेदना द्वारे मागणी (Implement effective measures to curb bogus journalists in the state – Progressive Journalists' Association demands in a memorandum to the Chief Minister.)
वृत्तसेवा :- बोगस पत्रकारांच्या हैदोसा मुळे खरे पत्रकार आणि पत्रकारिता धोक्यात आल्यामुळे बोगस पत्रकारांवर कायमचा अंकुश लावण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी मा.तहसीलदार बल्लारपूर यांचे मार्फत राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदना नुसार सामाजिक माध्यमांचे चलन आल्या पासून स्वतःला पत्रकार म्हणून घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ज्यांना बातमीचा "ब" आणि पत्रकारितेतला "प" माहित नाही असे महाभागही पत्रकार म्हणून मिरवत असल्याचे नमूद करण्यात आले असून ते पत्रकारितेचा गैरवावर करीत असल्याचे म्हटले आहे.यू ट्यूब आणि पोर्टल न्यूज चालविणारे अनेक उत्कृष्ट पत्रकारही समर्पित पत्रकारिता करीत असल्याचा उल्लेख करत असल्याचे विशेषत्वाने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.पण पत्रकारितेशी घेणे देणे नसलेल्यांचा भरणा अधिक झाला असल्याचे सांगत राष्ट्रीय सण किंवा दिवाळीच्या निमित्ताने जाहिरात दाराकडे एका तालुक्यात ५०० ते ७०० पत्रकारांचे निवेदन असते. त्यात वर्षभर राबणाऱ्या पत्रकारांची संख्या नगण्य असते.त्यामुळे खऱ्या पत्रकारांना खाजगी जाहिराती मिळणे जवळ जवळ बंद झाले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. बोगस पत्रकारितेवर अंकुश लावणे का आवश्यक आहे पत्रकारितेशी दूर पर्यंत सबंध नसलेले अनेक बोगस लोक एखाद्या पोर्टल अथवा युट्यूब चॅनल चे ओळखपत्र बनवून घेतात. (किंवा स्वतःचेच पोर्टल अथवा युट्यूब चॅनल उघडतात) या माध्यमातून अनेक अवैध धंदे, ब्लॅकमेलिंग, अवैध वसुली सर्रास केली जाते. त्यामुळे खरी पत्रकारिता बदनाम होऊन जनतेचा खऱ्या पत्रकारांवरील विश्वास कमी होऊ लागला असून उठ सुट कोणीही पत्रकार होत असल्याने त्यांची प्रत्यक्ष कामगिरी शून्य असली तरी दिवाळी आणि तत्सम जाहिरातीच्या वेळी या पत्रकारांचा आकडा तालुक्यात जवळपास ४०० ते ५०० आणि जिल्हा स्तरावर या पत्रकारांचा आकडा २५०० ते ३००० पर्यंत पोहचला असल्याचा गंभीर प्रकार निवेदनातून मांडण्यात आला आहे.यातील सर्वच पत्रकार बोगस नसले तरी यात ८० टक्के पत्रकार निश्चितच बोगस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या एकूण प्रकाराने जाहिरात दाराला जाहिरात कुणाला द्यावी, आणि कुणाला देऊ नये? हेच कळत नसल्याने खऱ्या पत्रकारांना अपेक्षित जाहिरात मिळत नाही. त्यामुळे या बोगस पत्रकारांमुळे जाहिरातीच्या कमिशनवर पोट असलेल्या खऱ्या पत्रकारांना उपासमारीची पाळी आली असल्याचेही निवेदनात निर्देशित केले आहे.
बोगस पत्रकारांवर अंकुश लावण्यासाठी केल्या जाऊ शकते उपाय योजना पत्रकारितेशी सबंधित नसलेल्या बोगस पत्रकारांवर कायम स्वरुपी अंकुश लावण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हामाहिती अधिकाऱ्यांकडून तालुका निहाय पत्रकारांची यादी मागवून यादीतील नोंदी नुसार प्रत्येक पत्रकारांची लेखी परीक्षा आयोजित करून (पत्रकार, बातमीदार, संपादक, मुख्य संपादक असे त्या त्या विभागाचे वेगळे गट पडून लेखी परीक्षांचे नियोजन करावे) आणि या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्याच पत्रकारांची स्वतंत्र यादी बनवून ती अधिकृत यादी प्रत्येक शासकीय कार्यालये, पत्रकार संघटनेला पाठवावी. यामुळे बातमीचा "ब" माहित नसलेले ८० टक्के अक्कलशून्य पत्रकार कमी होऊन राज्य बोगस पत्रकारां पासून मुक्त होऊ शकते;अशी विनंती वजा सूचनाही निवेदनातून करण्यात आली आहे. वर्षभर राबणाऱ्या खऱ्या पत्रकारांना मिळणार न्याय बोगस पत्रकारितेचे स्तोम माजण्यापूर्वी खऱ्या पत्रकारांना घरपोच सन्मानजनक जाहिराती मिळत होत्या.त्या कमिशन मधून वर्षभराचे आर्थिक नियोजन करण्यात पत्रकार सक्षम होता.मात्र बोगस पत्रकारांचा आकडा फुगत गेल्याने खऱ्या पत्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे बोगस पत्रकार कमी झाल्यास
पत्रकारितेत आपली हयात घालणाऱ्या, वर्षभर राबणाऱ्या खऱ्या पत्रकारांना अपेक्षित जाहिराती मिळतील.पत्रकारितेला सन्मान मिळेल. आणि जाहिरात दारांना जाहिराती देण्यास सोपा मार्ग उपलब्ध होऊन खऱ्या पत्रकारांना सन्मानजनक जाहिराती मिळतील. त्यातून खऱ्या पत्रकारांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन होऊ शकेल असा निष्कर्षही निवेदनातून मांडण्यात आला आहे. बोगस पत्रकारिता ही महाराष्ट्राला लागलेली वाळवी असून याचा तत्काळ बंदोबस्त आपल्या नियोजनातून झाल्यास राज्यातील सर्वच खरे पत्रकार आपल्या ऋणात राहतील.या साठी आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंतीही राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी मुखमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी भाजपा चे ज्येष्ठ नेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार,माजी विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनाही सादर करण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्र सोनारकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

0 टिप्पण्या