ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात तीन नव्या पाहुण्याची चाहूल, चांदणी वाघीनीने दिला 3 नव्या वारसांना जन्म ताडोबातील विडिओ व्हायरल (Three new arrivals at Tadoba-Andhari Tiger Reserve: Tigress Chandani gives birth to three new heirs; video from Tadoba goes viral.)
चंद्रपूर :- काही बातम्या आनंद देतात. काही बातम्या डोळ्यांच्या कडा ओलावून जातात. आणि काही बातम्या या दोन्ही भावना एकाच वेळी जाग्या करतात. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून मंगळवारी अशीच एक बातमी आली. तीन छोटे बछडे आपल्या आईच्या मागे मागे फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला. हे केवळ तीन नवीन बछडे नव्हते. ते ताडोबाच्या सर्वाधिक लोकप्रिय वाघांपैकी एक असलेल्या सीएम उर्फ छोटा मटका यांचे नातवंडे होते. सीएम उर्फ छोटा मटका हा वाघ आणि झरणी या वाघिणीची मुलगी चांदणी या वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. बल्ली हा वाघ त्यांचा पिता. त्यामुळे छोटा मटकाच्या वारशात आणखी तीन नव्या वारसांची भर पडली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच छायाचित्रकार, मार्गदर्शक, पर्यटक आणि ताडोबावर प्रेम करणाऱ्या हजारो लोकांनी तो शेअर केला. कारण छोटा मटका हा फक्त एक वाघ नाही, तर तो अनेकांच्या आठवणींचा भाग होता. पण, या आनंदाच्या बातमीची एक वेदनादायक बाजूही आहे. ज्याच्यामुळे हा वारसा पुढे चालला आहे, तोच छोटा मटका आज त्या जंगलात नाही.
अलिझंझा, निमढेला परिसरात सफारी करणाऱ्या पर्यटकांना छोटा मटका दिसला नाही, असे क्वचितच घडायचे. रुबाबदार चाल, अंगावरचा आत्मविश्वास आणि वाहनांकडे पूर्ण दुर्लक्ष करणारा त्याचा स्वभाव यामुळे तो पर्यटकांचा लाडका बनला होता. तो सहज दर्शन द्यायचा. त्यामुळे अनेक छायाचित्रकारांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट छायाचित्रांमध्ये छोटा मटका हमखास दिसतो. मात्र, या शांत चेहऱ्यामागे एक खरा योद्धा दडला होता. त्याच्या अधिवासात दुसऱ्या नर वाघाने प्रवेश करणे म्हणजे थेट आव्हान मानले जायचे. अनेकांनी प्रयत्न केले, पण छोटा मटकाने आपले साम्राज्य वर्षानुवर्षे टिकवून ठेवले. त्यामुळेच त्याला ताडोबाच्या बफर क्षेत्राचा राजा म्हटले जायचे. एक दिवस अशी लढाई झाली, ज्यातून छोटा मटका जिंकून बाहेर पडला, पण त्या विजयाची किंमत खूप मोठी होती. प्रतिस्पर्धी वाघाशी झालेल्या संघर्षात तो गंभीर जखमी झाला. जंगलात त्याने आयुष्यभर जसे संकटांवर मात केली, तसे यावेळीही तो उभा राहील, अशी अनेकांना आशा होती. पण तसे झाले नाही. जखमा वाढत गेल्या. प्रकृती खालावत गेली. आणि अखेर ताडोबाच्या जंगलात मुक्तपणे फिरणाऱ्या या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा बचाव केंद्रात हलविण्यात आले. तिथेच त्याचे आयुष्य थांबून राहिले.
छोटा मटका आज जंगलात नसला तरी त्याचा वारसा अजूनही ताडोबाच्या जंगलात फिरतो आहे. यापूर्वी बबली वाघीण आणि छोटा मटका यांचा मुलगा कलवा या वाघाने आनंद दिला. कलवा व पारू यांनी चार बछड्यांना जन्म दिल्यामुळे तो पहिल्यांदा आजोबा झाला होता. आता मुलगी चांदणीच्या तीन बछड्यांमुळे तो दुसऱ्यांदा आजोबा ठरला आहे. ताडोबाच्या जंगलात आज जेव्हा हे तीन छोटे बछडे पहिली पावले टाकत आहेत, तेव्हा त्यांच्या रक्तात त्या वाघाचा वारसा वाहतो आहे, ज्याने एकेकाळी संपूर्ण परिसरावर अधिराज्य गाजवले होते. ताडोबाचा राजा आज जंगलापासून दूर असला, तरी त्याची कहाणी अजून संपलेली नाही. ती आता त्याच्या नातवंडांच्या रूपाने पुन्हा जंगलात लिहिली जात आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या