छत्रपती संभाजीनगर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा सोबतच संलग्नित महाविद्यालयातील ग्रंथालयात येत्या १२ एप्रिल रोजी सलग १८ तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त सदर उपक्रम राबविण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी १८ तास सतत वाचन उपक्रम आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित करण्याबाबत. मा. प्राचार्य/प्राचार्या, सर्व संलग्नित महाविद्यालये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर उपरोक्त विषय व संदर्भानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयांना कळविण्यात येते की, दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिनांक १२ एप्रिल हा १८ तास सतत अभ्यास अभियान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या अभियानाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय निर्माण होणे, एकाग्रता वाढविणे व वेळेचे व्यवस्थापन करणे हा आहे. त्यासाठी आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयात दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून सदर अभियानास सुरुवात करावी. सदर अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी घेणे, दर २- ३ तासांनी छोटा ब्रेक देणे, विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी व चहा उपलब्ध करून देणे, ग्रंथालयात शांत व अभ्यासपूर्ण वातावरण निर्माण करणे व मार्गदर्शक शिक्षकांकडून या अभियानावर देखरेख ठेवणे अपेक्षित आहे. या संदर्भात महोत्सव समितीची बैठक होऊन ७ ते १४ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संलग्नित सर्व महाविद्यालयांनी या उकप्रमात सहभागी व्हावे, असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी कळविलेले आहे. विद्यापीठ ग्रंथालयात प्रदर्शन यानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्त्रोत केंद्र अर्थात ग्रंथालयात येत्या ७ ते १४ एप्रिल दरम्यान ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी ११ वाजता करण्यात येईल. प्रदर्शनात दुर्मिळ ग्रंथ ठेवण्यात येणार आहेत. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक डॉ.वैशाली खापर्डे यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या