बल्लारपूरात होणार राज्य राखीव दलाची छावणी, पॉवर हाऊस परिसरातील ४५ एकर जागा राज्य राखीव पोलीस दलासाठी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाची मान्यता (State Reserve Police Force camp to be set up in Ballarpur; State Government approves making 45 acres of land in the Power House area available for the force.)
बल्लारपूर :- शहर व तालुक्यासाठी महत्त्वाची ठरणारी राज्य राखीव पोलीस दलाची छावणी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, बंद पडलेल्या पॉवर हाऊस परिसरातील ४५ एकर जागा राज्य राखीव पोलीस दलासाठी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. यासंदर्भात मंत्रालयात गृह विभागाचे अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत, नागपूरचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दलाचे कमांडंट जगताप तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बल्लारपूर शहरातील बंद पडलेल्या पॉवर हाऊसची सुमारे ३१.३५ हेक्टर शासकीय जमीन अनेक वर्षांपासून वापराविना पडून आहे. ही जागा राज्य राखीव पोलीस दलासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे निदर्शनास आणून देत माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या परिसरातील ४५ एकर जमीन राज्य राखीव पोलीस दलासाठी देण्याची मागणी शासनाकडे केली होती. प्रस्तावित जागेवर राज्य राखीव पोलीस दलाचे कवायत मैदान, शासकीय निवासस्थाने, अधिकारी विश्रामगृह, समादेशक कार्यालय, शस्त्रागार, बॅचलर बॅरक, मेस, मोटार परिवहन विभाग, क्रीडांगण, दरबार हॉल, रुग्णालय, उपहारगृह, शाळा, जिम्नॅशियम, मनोरंजन हॉल तसेच नक्षलविरोधी कारवायांसाठी विशेष प्रशिक्षण व मुक्काम सुविधा उभारण्यात येणार आहेत. बैठकीत अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या मागणीला शासनाची मान्यता देण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच यासंदर्भातील आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, नक्षलविरोधी मोहिमांना गती मिळेल. तसेच रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या