धक्कादायक ! बल्लारपूरात डीजे ऑपरेटरचे अपहरण करून ३-४ जणांकडून निर्घृण मारहाण, ३ आरोपी अटकेत (Shocking ! DJ Operator Abducted and Brutally Beaten by 3-4 Individuals in Ballarpur; 3 Accused Arrested.)
बल्लारपूर :- लग्नाच्या वरातीत डीजे वाजवत असलेल्या तरुणाला बोलण्याच्या बहाण्याने दूर नेऊन ३ ते ४ जणांनी मिळून निर्घृण मारहाण केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे. पीडित सुमीत सुरेश सुर्यवंशी (वय २२), व्यवसाय डीजे ऑपरेटर, रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास न्यू कॉलनी परिसरात एका लग्नाच्या वरातीत डीजे वाजवत असताना सुमित यादव व डॅनियल हे दोघे त्यांच्याकडे आले. बोलायचे असल्याचे सांगून त्यांनी सुर्यवंशी यांना डीजे सोडून बाहेर नेले. यानंतर आरोपींनी त्यांना दुचाकीवर बसवून ऑटो स्टँडमार्गे शिवटेकडी मैदानाजवळील पानठेल्याजवळ नेले. तेथे आधीपासून उपस्थित असलेल्या आणखी १-२ अज्ञात साथीदारांसह एकूण ३ ते ४ जणांनी मिळून सुमित यादव यांनी माझ्या बहिणीला मेसेज करून शिवीगाळ का केली या कारणावरून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
गंभीर जखमी केल्यानंतर आरोपींनी पीडिताला जय भीम चौकजवळील परिसरात टाकून दिले. स्थानिकांच्या मदतीने पीडिताने मित्रांना संपर्क साधला. मित्रांनी ऑटोने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी सुमित सुनील यादव (१९), डॅनिअल परवेझ कुरेशी (२१) आणि संघर्ष किशोर तेलतुंबडे यांना अटक केली असून, इतर अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), १४०(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ एप्रिल रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या