चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटनाला भरारी, उद्योगांना उभारी, नैसर्गिकरित्या समृद्धतेला प्रदूषणासह मानव-वन्यजीव संघर्ष चिंतेचा विषय ? (In Chandrapur district—where tourism is soaring and industries are gaining momentum—are pollution and human-wildlife conflict becoming matters of concern amidst its natural abundance ?)
चंद्रपूर :- कधीकाळी मागास, आदिवासी जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला व्याघ्र पर्यटनाने जगाच्या नकाशावर नेले आहे. दुसरीकडे, कोळसा खाणी, सिमेंट उद्योगांसह हजारो लघुउद्योगांनी या जिल्ह्याला औद्योगिक आकारही दिला आहे. या दोन्ही क्षेत्रांत आगेकूच करत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यासमोर प्रदूषण आणि मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या आव्हान उभे करत आहे. चंद्रपूर जिल्हा दरडोई देशांतर्गत उत्पादनात आघाडीवर आहेच; पण २९२० मेगावॅट क्षमतेचे महाऔष्णिक विद्युत केंद्र असलेल्या या जिल्ह्यात दरडोई वीजवापरही अधिक आहे. खनिज संपत्तीचे वरदान लाभलेल्या या जिल्ह्यात दीड ते दोन हजार लघुउद्योग आहेत. यामध्ये प्रामुख्याने राइस मिल, प्लाय ॲशपासून विटा, दरवाजे तथा अन्य वस्तू तयार करणारे आणि इतरही छोटे उद्योग आहेत. तसेच वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या कोळसा खाणी, सिमेंट व पोलाद कारखाने, पेपर मिल व कोळशावर आधारित उद्योग आहेत. याच वर्षी १४ मार्च रोजी भद्रावती एमआयडीसी येथे भारतातील पहिला ग्रीनफिल्ड कोळसा गॅसिफिकेशन (कोळसा ते रसायने) प्रकल्प १६५० एकरवर उभारण्यात येत आहे. ग्रेटा एनर्जी प्रा. लि. व न्यू एरा क्लिनटेक प्रा. लि. या दोन ग्रीनफिल्ड स्टील प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. एकूण १० हजार ३१९ कोटी भांडवली गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामुळे ५ हजारांहून अधिक लोकांना रोजगाराची संधी मिळेल. त्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर पडणार आहे.
राज्यातील ४२ टक्के जंगल या जिल्ह्यात आहे. जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे जागतिक नकाशावर या जिल्ह्याला ओळख मिळाली आहे. या माध्यमातूनच येथे औद्योगिक आणि पर्यटन अशा दोन्ही पातळ्यांवर विकास होत आहे. येथे पंचतारांकित रिसोर्टसोबत न्याहारी निवास हा व्यवसाय वाढीस लागला आहे. परिणामी २०२५-२६ मध्ये ३ लाख ८१ हजार पर्यटकांनी ताडोबाला भेट दिल्याची नोंद आहे. विदर्भातील १०० खाटांचे आधुनिक पंडित श्यामाप्रसाद मुखर्जी कॅन्सर हॉस्पिटल येथे आहे. मा.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्याचबरोबर बल्लारपूर येथे शंभर खाटांच्या कामगार रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. सिकलसेल हॉस्पिटलही आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्राला मंजुरी मिळाली असून एसएनडीटी महिला विद्यापीठ, केंद्रीय सैनिक विद्यालय, वैद्यक महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज आणि पायलट प्रशिक्षण केंद्र येथे आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या