Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

माणूस कितीही मोठा झाला, तरी 'जात' काही केल्या जात नाही (No matter how great a person becomes, the 'caste' simply does not go away.)

माणूस कितीही मोठा झाला, तरी 'जात' काही केल्या जात नाही (No matter how great a person becomes, the 'caste' simply does not go away.)


वृत्तसेवा :- भारतीय संसदेच्या सर्वोच्च सभागृहात राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नुकताच एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न देशासमोर ठेवला. देशाच्या वर्ण वादीवादी व्यवस्था आणि मानसिकतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. अतिशय भाऊक होऊन त्यांनी संबंध देशाला मानवता वादी माणसाला अस्वस्थ करून सोडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हल्द्वानी येथे त्यांनी ज्या मंचावर भाषण केले, त्या मंचाचे नंतर कथितरीत्या ‘शुद्धीकरण’ करण्यात आले. या घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत दिले. ही केवळ एका राजकीय नेत्याचा अपमान करण्याची घटना म्हणून पाहता येणार नाही. कारण प्रश्न मल्लिकार्जुन खरगे नावाच्या व्यक्तीचा नाही; प्रश्न आहे भारतीय समाजाच्या मनात अजूनही जिवंत असलेल्या जातीय मानसिकतेचा. खरगे हे देशाच्या राजकारणातील अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. पण त्यांची ओळख एवढ्यावरच संपत नाही. ते अनुसूचित जातीच्या समाजातून आलेले आहेत. संघर्षातून वर आलेल्या या माणसाने भारतीय राजकारणात सर्वोच्च पदांपर्यंत मजल मारली. मग प्रश्न असा पडतो
            माणूस कितीही मोठा झाला, कितीही शिकला, कितीही सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवली, तरी त्याची जात काही केल्या जात नाही.. हा प्रश्न खरगे यांच्यापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न त्या प्रत्येक भारतीयासाठी आहे, ज्याला संविधानाने समानतेचा अधिकार दिला आहे; पण समाजातील काही विकृत मानसिकता आजही त्याला जात, जन्म आणि स्पर्शाच्या जुन्या चौकटीत मोजते. एका बाजूला आपण चंद्रावर पोहोचल्याचा अभिमान बाळगतो. कृत्रिम डिजिटल इंडिया, आर्थिक महासत्ता, विश्वगुरू अशा घोषणा करतो. आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या व्यक्तीने मंचावर उभे राहून भाषण केले म्हणून तो मंच ‘अपवित्र’ झाला, अशी मानसिकता जर कुठे डोके वर काढत असेल, तर आपण आधुनिक झालो तरी आपली मानसिकता आधुनिक झाली आहे का? हा प्रश्न विचारावाच लागेल.
गोमूत्र हे कोणासाठी? शुद्धीकरन..एखाद्या माणसाच्या जातीय ओळखीमुळे त्याच्या स्पर्शाने किंवा उपस्थितीने जागा अपवित्र होते, अशी समजूत बाळगण्याचा.
हीच मानसिकता शतकानुशतके अस्पृश्यतेला जन्म देत आली. कुणाला विहिरीवर पाणी भरू दिले नाही. कुणाला मंदिरात प्रवेश नाकारला. कुणाला गावाच्या बाहेर वस्ती करायला भाग पाडले. कुणाला शाळेत वेगळे बसवले. कुणाला सार्वजनिक रस्त्यावरून चालण्याचा अधिकारही नाकारला. डॉ बाबासाहेबांचा मोजता येणार नाही इतक्या दा अपमान झाला.. पशुपतिनाथ च्या मंदिराचे शुद्धीकारण.ते मल्लिकार्जुन खरगे . हजारो वर्ष्याच्या जखमा या निमित्ताने ओल्या झाल्या. खरगे यांच्या संदर्भातील हा वाद नाही समाज व्यस्थेतून अधिकच्या जखमा खोलवर गेल्या आता यातून पु.. (पस ) वहायला लागलंय उद्या संपूर्ण देशाला गँगरिंग झाल्या शिवाय राहणार नाही. तेव्हा उपचारासाठी कुठलाही डा आंबेडकर निर्माण होणार नाही. एका बाजूला संसदेत सामाजिक न्याय, समानता आणि संविधान यांची चर्चा होते; तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक जीवनात एखाद्या व्यक्तीच्या जातीय ओळखीला केंद्रस्थानी ठेवून ‘शुद्धीकरणा’सारखी कृती घडल्याचा आरोप समोर येतो. हे दोन भारत एकाच वेळी अस्तित्वात आहेत का? एक भारत संविधानाचा आहे. दुसरा भारत अजूनही मनुस्मृतीच्या सावलीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. पहिल्या भारतात माणसाची ओळख त्याच्या कर्तृत्वाने होते. दुसऱ्या भारतात जन्माने. पहिला भारत म्हणतो “सर्व भारतीय समान आहेत.” दुसरा भारत विचारतो “तुमची जात कोणती?”
          ही लढाई फक्त भाजप विरुद्ध काँग्रेस अशी नाही. हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नाही. जातीयवादाला राजकीय रंग देऊन त्याची तीव्रता कमी करता येणार नाही. जातीय मानसिकता कोणत्याही पक्षात, कोणत्याही समाजात आणि कोणत्याही व्यक्तीत आढळली तर तिचा विरोध झालाच पाहिजे. परंतु सत्ताधारी राजकीय शक्तींनी अशा घटनांपासून स्वतःला स्पष्टपणे वेगळे करणे हे धोक्याचे ठरते. आज खरगे यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. तो फक्त त्यांचा प्रश्न म्हणून बाजूला सारता येणार नाही. हा प्रश्न त्या कोट्यवधी भारतीयांचा आहे ज्यांच्या पूर्वजांना जातीय भेदभाव सहन करावा लागला. आणि म्हणूनच आज देशाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे— आपण संविधान स्वीकारले आहे; पण संविधानाची मूल्ये आपल्या मनाने स्वीकारली आहेत का? मंच गोमूत्राने धुतल्याने मंच पवित्र झाला की नाही, हा श्रद्धेचा प्रश्न असू शकतो. पण एखाद्या माणसाच्या जातीकडे पाहून त्याच्या उपस्थितीला अपवित्र मानले असेल, तर पवित्र करण्याची गरज मंचाला नाही. मनाला आहे. कारण मंचावर उभा असलेला माणूस अपवित्र नसतो. माणसाला अपवित्र ठरवणारी मानसिकता मात्र नक्कीच अपवित्र असते. भारताला आज मंदिरांपेक्षा, मंचांपेक्षा आणि राजकारणापेक्षा मोठ्या एका ‘शुद्धीकरणा’ची गरज आहे. मनाच्या शुद्धीकरणाची.जात नष्ट करण्याचा प्रवास अजून संपलेला नाही. आणि म्हणूनच बाबासाहेबांचा प्रश्न आजही आपल्या समोर उभा आहे माणूस म्हणून माणसाला कधी स्वीकारणार? हीच खरी परीक्षा आहे भारतीय लोकशाहीची.या संधर्भात रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड यांनी संसदेत जातीची व्याख्या केली. "जात जन्माने येते. जन्म भर राहते. मेल्यावर ही जात नाही ती जात..

संकलन :- पवन भगत

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या