चंद्रपुरात रस्त्याअभावी गर्भवती पत्नीचा मृत्यू, पतीने प्रशासनाची वाट न पाहता गावाकऱ्यासह टिकास, फावडा घेऊन बांधला रस्ता (Pregnant wife dies in Chandrapur due to lack of a road; husband, without waiting for the administration, builds a road with a fellow villager using a pickaxe and shovel.)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगाणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यातील घोडानाकप्पी गावातील रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. टेकड्यांनी व पहाडानी वेढलेल्या या गावात सुमारे 20 घरांची वस्ती असून, गेल्या तीन दशकांपासून येथे आदिवासी समाज वास्तव्यास आहे. गावात अंतर्गत काँक्रीटचा रस्ता, अंगणवाडी आणि गावाबाहेर जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मात्र गावापर्यंत पोहोचण्यासाठी आजही खडकाळ पायवाटेचा आधार घ्यावा लागतो. या मार्गावर दुचाकी वाहनच पोहोचत नाही, तर रुग्णवाहिका पोहोचणेही शक्य होत नाही. त्यामुळे आजारी व्यक्ती तसेच गर्भवती महिलांना वेळेवर उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर डांबरी रस्ता संपतो आणि त्यानंतर गावापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग नसल्याचे दिसून येते.
विशेष बाब म्हणजे याच रस्त्याअभावी दोन महिन्यांपूर्वी गर्भवती संगीता गेडाम या 25 वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. प्रसूतीची वेळ आल्यानंतर तिला वेळेवर उपचारासाठी घेऊन जाण्यात अडचणी आल्या. रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे तिला अवघड मार्गातून दुसऱ्या वाहनाने नेण्याची वेळ आली. या घटनेनंतर मागे तीन वर्षांचा मुलगा, नवजात मुलगी आणि कुटुंबाची जबाबदारी पतीवर येऊन ठेपली. संगीताचे पती तुळशीराम गेडाम यांनी रस्त्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. ग्रामस्थांनीही अनेकदा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना रस्त्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे 2021 मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत गावापासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत रस्ता बांधण्यात आला. मात्र गाव टेकडीच्या पायथ्याशी असल्याने उरलेल्या दीड किलोमीटर अंतरासाठी पुन्हा खडकाळ पायवाटच राहिली. पावसाळ्यात ही वाट आणखी धोकादायक होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतरही रस्त्याचा प्रश्न कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. गावापर्यंत रस्ता नसल्याने केवळ वाहतुकीचीच नव्हे, तर आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित अडचणीही निर्माण होत आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिकण्यासाठी गावातील मुलांनाही याच खराब मार्गातून यावे लागते. सध्या ग्रामस्थांनी श्रमदानातून अर्धा रस्ता पूर्ण केला असून उर्वरित रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पत्नीला गमावल्यानंतर तुळशीराम गेडाम यांनी घेतलेला हा निर्णय आता चर्चेत आला आहे. मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटला नाही आणि अखेर ग्रामस्थांनाच स्वतःच्या हातांनी रस्ता तयार करण्याची वेळ आली, अशी परिस्थिती घोडानाकप्पी गावात पाहायला मिळत आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतरही तुळशीराम गेडाम थांबले नाहीत. प्रशासनाकडून रस्ता तयार होण्याची वाट पाहण्याऐवजी त्यांनी गावातील आदिवासी बांधवांसोबत स्वतःच रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्टपासून ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्त्याचे काम सुरू केले. कोणतीही मोठी यंत्रसामग्री किंवा कंत्राटदार नसताना ग्रामस्थांनी टिकास, पावडा आणि इतर साधनांच्या मदतीने रस्ता तयार करण्यास सुरुवात केली. सुमारे दीड किलोमीटरचा हा मार्ग गावापर्यंत जाण्यासाठी तयार केला जात आहे. ग्रामस्थांना जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा ते एकत्र येऊन रस्त्याचे काम पुढे नेत आहेत. या कामात वयस्कर ग्रामस्थांचाही सहभाग असल्याचे दिसून आले. यापूर्वी अनेकदा प्रशासनाला माहिती देऊनही रस्त्याचा प्रश्न सुटला नसल्याने अखेर ग्रामस्थांनी स्वतःच हा मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या