बल्लारपूरात अवैध अतिक्रमणा विरोधात पत्रकारांचा तीव्र भूमिका जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाई करण्याच्या सूचना (Journalists take strong stand against illegal encroachment in Ballarpur, submit a statement to the District Collector, instructions to take action)
बल्लारपूर :- शहरात वाढत्या वाहतूक कोंडी व वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे निरपराध नागरिकांचे बळी जात असताना त्याला कारणीभूत ठरत असलेल्या अवैध अतिक्रमणाविरोधात पत्रकारांनी तीव्र भूमिका घेतली आहे. आज बल्लारपूर येथे आयोजित जनता दरबारादरम्यान महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा बल्लारपूरतर्फे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांना निवेदन देऊन तातडीने ठोस कारवाईची मागणी करण्यात आली. बल्लारपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे झालेल्या जनता दरबारात जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पेपर मिल ते बामणी मार्ग, तहसील कार्यालयासमोर, रेल्वे चौक, जुना व नवीन बसस्थानक परिसर, एन्ट्री गेट, पेपर मिल परिसर तसेच सुभाष टॉकीज परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी दररोज वाहतूक कोंडी व अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहतात, तेथे सुलभ पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे पत्रकारांनी नमूद केले. प्रशासनाला सर्व परिस्थिती दिसत असताना कारवाई का होत नाही? एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच यंत्रणा जागी होणार का? असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. शहरातील मृत्यूंसाठी अवैध अतिक्रमणधारक जबाबदार की मूकदर्शक अधिकारी, असा प्रश्नही पत्रकारांनी उपस्थित केला. निवेदन सादर करताना रमेश निषाद, विकास राजुरकर, राहुल गायकवाड, शंकर महाकाली, प्रमोद गहलोत, राजू राठोड यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तातडीने प्रभावी कारवाई न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिले. आता नगर प्रशासन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई करते की कारवाई कागदापुरतीच मर्यादित राहते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या