मुल शहरात अशोका बारमध्ये हप्ता वसुली वरून धुडगूस : १० हजारांची लूट, कर्मचाऱ्यावर हल्ला - तिघांना अटक (In Mul city, there was a ruckus over installment collection at Ashoka Bar: Rs 10,000 looted, employee attacked - three arrested)
चंद्रपूर :- मुल शहरातील अशोका बारमध्ये महीनेवारी हप्ता मागण्याच्या कारणावरून तिघांनी बारमध्ये घुसून धुडगूस घालत रोख रक्कम लुटल्याची व कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२३ फेब्रुवारी) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुल पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण नामदेव जुनघरे (२६), रा. चेकपिपरी ता. गोंडपिपरी हे अशोका बारमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काउंटर सांभाळत होते. बारचे नियमित व्यवस्थापक रजेवर असल्याने त्यांनी २१ फेब्रुवारीपासून काउंटरची जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान, बारमधील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी प्लास्टिक खुर्चीने मारहाण केली. तसेच काउंटरवरील मॉनिटर व काचेचे ग्लास फोडून सुमारे ६ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. बार सुरळीत चालवायचा असल्यास दरमहा ५ हजार रुपये हप्ता देण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
२३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता आरोपी रमन विलास डोर्लीकर, करण शशिकांत डोर्लीकर व करण धर्मेंद्र गेडाम सर्व रा. विहीरगाव, ता. मुल हे बारमध्ये आले. बारमालक महीनेवारी हप्ता देत नसल्याचा आरोप करत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर एका आरोपीने काउंटरवरील काटेरी चमच्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली व काउंटरमधील १० हजार रुपयांचे बंडल जबरदस्तीने हिसकावून नेले. घटनेनंतर फिर्यादीने बारमालकांना माहिती देत तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९६, ३(५), ३०९(६), ३२४(२), ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या