Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

अबब ! नागपुरातून चक्क १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची एसटी महामंडळाची 'शिवाई' इलेक्ट्रिक बस अमरावतीला चोरून नेली (Incredible! An ST Corporation 'Shivai' electric bus worth a staggering ₹1.53 crore was stolen from Nagpur and driven to Amravati.)

अबब ! नागपुरातून चक्क १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची एसटी महामंडळाची 'शिवाई' इलेक्ट्रिक बस अमरावतीला चोरून नेली (Incredible! An ST Corporation 'Shivai' electric bus worth a staggering ₹1.53 crore was stolen from Nagpur and driven to Amravati.)

नागपूर :- नागपूरच्या इमामवाडा बस आगारातून चक्क १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची एसटी महामंडळाची 'शिवाई' इलेक्ट्रिक बस चोरीला गेल्याची एक अत्यंत अजब आणि थरारक घटना समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देत मध्यरात्रीच्या सुमारास पळवलेली ही हायटेक बस अखेर अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी चोरासह ताब्यात घेतली आहे. अटक करण्यात आलेल्या आंतरराज्यीय चोराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याची चोरी करण्याची पद्धत ऐकून स्वतः पोलीस अधिकारीही अवाक झाले आहेत. १ जुलै रोजी गुरुवारी मध्यरात्री ३:३० वाजताच्या सुमारास नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकातील चार्जिंग स्टेशनवर 'एमएच ४९/ बी. झेड. ८२५८' क्रमांकाची 'शिवाई' ई-बस चार्जिंगसाठी उभी होती. यावेळी तेलंगणातील एका अट्टल चोराने संधी साधून ही दीड कोटींची बस थेट तिथून पळवून नेली आणि अमरावतीच्या दिशेने सुसाट निघाला. सकाळी ९ वाजेपर्यंत बस आगारात न दिसल्याने सुरक्षारक्षक सुरेंद्र मिश्रा यांनी आगार व्यवस्थापक इमरान पटेल यांना माहिती दिली. एसटी महामंडळाची हक्काची बस गायब झाल्याने नागपूर पोलीस आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली. 
          एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये 'व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम' (VTS) बसवण्यात आली आहे. बस चोरीला गेल्याचे समजताच नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ इंटरनेटवर या इलेक्ट्रॉनिक चीपच्या माध्यमातून बसचे रिअल-टाइम लोकेशन ट्रॅक केले. तेव्हा ती बस अमरावतीजवळ हायवेवर असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर कंट्रोल रूमने तातडीने अमरावती पोलिसांना अलर्ट केले. दरम्यान, अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदा मार्केटजवळ एक संशयास्पद बस उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच बस पळवणारा तरुण गद्रे चौकात असल्याची टीप मिळताच, राजापेठ पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचून बससह चोराला बेड्या ठोकल्या. 
           पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव विष्णू गणपती नीलावर (वय २३, रा. हईत नगर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) असे आहे. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली, पण पुढील तपासात जे समोर आले त्याने पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. या आरोपीने आतापर्यंत तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून तब्बल २० हून अधिक सरकारी बसेस चोरल्या आहेत! महाराष्ट्रातील नांदेड बसस्थानकावरूनही त्याने यापूर्वी एक बस पळवली होती. पोलीस तपासात समोर आले की, या अट्टल चोराला केवळ बस चोरून ती घेऊन फिरण्याची सवय आहे. ई-बस पळवल्यानंतर तिची चार्जिंग संपली की तो ती रस्त्याच्या कडेला उभी करायचा आणि त्या बसचे महागडे टायर्स व बॅटरी काढून बाजारात विकायचा. या कुख्यात आंतरराज्यीय चोरावर आधीच वजिराबाद, तिरुमला सीसीएस यांसह अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. एसटी महामंडळाची ट्रॅकिंग सिस्टीम आणि नागपूर-अमरावती पोलिसांची सतर्कता यामुळे चोर पोलिसांच्या कचाट्यात अडकला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या