विकासाच्या मालिकेमध्ये मुल शहर वेगाने पुढे जाईल ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास (In the series of developments, the Mul city will advance rapidly, won't it? Mr. Sudhir Mungantiwar expressed his belief)

Vidyanshnewslive
By -
0
विकासाच्या मालिकेमध्ये मुल शहर वेगाने पुढे जाईल ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास (In the series of developments, the Mul city will advance rapidly, won't it? Mr. Sudhir Mungantiwar expressed his belief)


मुल :- मुल शहराच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून आजपर्यंत कार्य करीत आलो आहे. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रोजगार, आरोग्य, कृषी, शिक्षण, सिंचन या पंचसूत्रीवर भर देण्यात येत आहे. भविष्यात विकासाच्या मालिकेत मुल शहर वेगाने पुढे जाईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मुल येथे नागरिकांशी संवाद साधताना ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. आरोग्य सेवा अद्ययावत करण्यासाठी मुल व पोंभूर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सात उपकेंद्रांना मंजुरी दिली. मुल येथे 107 कोटी रुपये खर्चून 100 खाटांच्या सर्व सोयीसुविधायुक्त रुग्णालयाची निर्मिती होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक शिक्षणात शंभर टक्के शुल्क सवलत देण्यात येत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रात काम होत आहे.शहरी भागातील आदिवासी बांधवांसाठी शबरी आवास योजना लागू करण्यात आली असून आवास योजनेचे अनुदान 2.50 लाखापर्यंत वाढविण्यात आल आहे.असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. गरिबांसाठी आरोग्य शिबिरे, नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन केले. गरजूंच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. अतिवृष्टीमध्ये नागरिकांना आर्थिक सहकार्य केले. दिव्यांगांना सायकल तसेच महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले. सर्वसामान्य घटकातील नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. कांग्रेसच्या सत्तेच्या काळात विकासकामे झाली नाही या राज्यामध्ये 2 वर्षे 8 महिने काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेसचा खासदार व पालकमंत्री असताना देखील विकास कामे केली नाहीत. मुल शहरातील जनता जातीपातीच्या राजकारणाला मत न देता, मुल शहराच्या विकासाला आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्याला मत देतील, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 
            मुलच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय मुल शहराचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी 80 टक्के रस्ते बांधून पूर्ण केले. येत्या पाच वर्षात शिल्लक रस्ते बांधून पूर्ण होतील. मुलमध्ये शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज उघडण्याचा निर्णय करण्यात आला आहे. तसेच मुल बायपासचा विषय निकाली काढण्यात येणार असून रेल्वे गेटवर ब्रिज करण्यास प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. 15 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज मुल-पोंभुर्णाच्या मध्ये भारतातील सर्वात मोठा पोलाद उद्योग उभा राहत असून येथील तरुणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. बचत गटासाठी बाजारपेठ उभारून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न राहील. येत्या मार्च महिन्यातील अधिवेशनाध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होऊन वर्षभरात कर्जमाफी करण्याचा निर्णय करण्यात येणार आहे. विविध जाती प्रवर्गातील तरुण- तरुणींना 15 लाखापर्यंतचे व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)