" सम्राट अशोक " भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध ("Emperor Ashoka" Discovery of the Lost Emperor of India)
वृत्तसेवा :- पूर्ण भारताला एकछत्र अंमलाखाली आणणारा पहिला राजा म्हणजे सम्राट अशोक. जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणाऱ्या बौद्ध धम्माचा प्रचारक अशी आपल्याला सम्राट अशोकाची ओळख आहे. नैतिकतेची तत्वे प्रसारित करणाऱ्या या महान सम्राटाची ओळख मला झाली ती एका अतिशय सुंदर पुस्तकातून. पुस्तकाचे नाव – ‘अशोक – भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध’ ती ओळख रहस्यमयी, गूढ आणि उत्कंठावर्धक होती. अशोकाच्या सर्व – सामान्य इतिहासात एक गोष्ट आपणा सर्वांना माहीतच आहे की कालचक्राची गती, मानवी हिंसेचा तडाखा आणि बौद्ध धम्माप्रति असणारा ब्राह्मणांचा द्वेष या सर्वांच्या परिणामाने बौद्ध धम्मावर कशा प्रकारे हल्ले झाले. ब्राह्मणी असहिष्णुता व अतिरेकी मुस्लिम आक्रमकांची भूमिका या धम्माच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरली. ब्राम्ह्मणी वैरभावाचा मोठा पुरावा म्हणजे भारतीय इतिहासाचा फार मोठा अनेक शतकांचा भारतातील बौद्ध इतिहास काढून टाकण्यात आला. बौद्धांच्याप्रती वैरभाव असलेल्या ब्राह्मणी पंडितांनी केलेल्या इतिहासाच्या पुनर्लेखनामुळे अशोकाची गाथा नि:शब्द करून तिला इतिहासातून पुसून टाकण्यात आले. अशोकाने धार्मिक सहिष्णुतेला महत्त्व दिले. सर्वांनी अहिंसेने एकत्र नांदावे ही त्याची मनीषा होती. पूर्ण भारतभर बौद्धमताचा प्रचार करून अशोकाने जातीवर आधारित ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान दिले. साहजिकच त्याचे हे कार्य ब्राह्मणी व्यवस्थेला सहन होणारे नव्हते.
१८ व्या शतकाच्या शेवटी व १९ व्या शतकाच्या सुरवातीला मुस्लिमपूर्व भारताचा इतिहास पुनः प्रकाशित करण्यात आला. युरोपियन पुरातत्ववेत्ते यांनी अशोकाच्या शोधात फार मोलाची भूमिका पार पाडलेली आहे. अनेक विदेशी अभ्यासक, फाहीयान आणि हुएनसांग यांचे प्रवास वर्णने यांनी सुद्धा महत्वाची भूमिका पार पडली. ब्रिटिशांनी भारतात केलेल्या अनेक विधायक कार्यापैकी अशोकाच्या शोधाची पुनर्प्रक्रिया हे एक महत्वाचे कार्य आहे. भारतीय भूमीवर सर्वत्र इतिहासाच्या पाऊलखुणा विखुरलेल्या होत्या. एखाद्या जिगसॉ कोड्याच्या तुकड्यांप्रमाणे या खुणा ओळखून प्रयत्नपूर्वक जोडून चुका करून आणि त्यापासून शिकून त्यांनी भारताचा इस्लामपूर्व इतिहास शोधण्याचे कार्य २०० वर्ष केले आणि या कष्टाचे फळ म्हणजे अशोक कसा होता, आशिया खंडाच्या घडवणुकीत त्याचा किती मोठा वाटा होता. याच बरोबर बुद्ध धम्माच्या अनेक अज्ञात गोष्टींची ओळख होते. पूर्ण ओळख झाली असे न म्हणता आपण म्हणू शकतो की त्याला समजून घेण्यात बऱ्यापैकी यश आले. जॉन मार्शल (भारतातील पहिला प्रचविद्या संशोधक) , विल्यम जोन्स, प्रिंसेप, हौजसोन, टर्नोर, कनिंगहॅम अशा कितीतरी प्राच्यविद्या विशारदांनी अतिशय निरपेक्षपणे या शोधात आपली कामगिरी केलेली आहे. अशोकाची गाथा आपण ज्याला म्हणू शकतो ते म्हणजे त्याचे शिलालेख आणि स्तंभालेख. तत्कालीन ब्राह्मी लिपी मध्ये लिहले गेले. या लेखांनमधून कंदाहार ते इरावतीच्या खाडीपर्यंत आणि कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंतच्या शेकडो लेखांमधून अशोकाची गाथा स्पष्टपणे ऐकू येते. अशोकाचे स्तंभालेख वाचण्यात प्रिंसेप ने अतिशय महत्वाचे कार्य केले. स्तंभावरील ही लिपी ब्राम्ही होती याचा बोध प्रिंसेप ला झाला. आधी त्याने सांचीच्या स्तूपावरील नोंदीचे भाषान्तर केले. बोधगयातील अनेक छोट्या शिलालेखांचे भाषांतर केले. दिल्ली, अलाहाबाद, गिरनार, धौली या सर्व स्तंभावरील लेखाच्या सुरवातीला आणि फिरोजशहाला सापडलेल्या स्तंभांवरील वाक्यांशाची सुरवात एकसारखीच होती. शेवटी, ‘देवानंपिय पियदसी लाजा हेव आह’ असे त्याचे लिप्यंतर केले.
सम्राट अशोकाला या लेखांत देवानंपिय राजा असे म्हटले आहे. काही इतिहासकारांनी मात्र याचा अर्थ देवांना प्रिय असणारा राजा असे भाषांतर केले. अशोकाचे शिलालेख व स्तंभालेख यात कुठेही देव, कर्मकांड, भक्ती, इत्यादी शब्दांचा उल्लेख आढळत नाही. तेव्हा देवांना प्रिय असणारा राजा हे भाषांतर संशयास्पद वाटते. अशोकाचे हे लेख पाली भाषेतील आहे. या प्रश्नाचे उत्तर मला – खोए हुए बुद्ध की खोज (लेखक – डॉ. राजेंद्र प्रसाद सिंह) या पुस्तकात मिळाले. या अभिलेखात देव शब्द नसून देवा शब्द आहे. देवा आणि देव या मध्ये निश्चितच फरक आहे. विष्णू, इंद्र, इत्यादींना देव मानले गेले. देव हा संस्कृत शब्द आहे. बुद्ध किंवा अर्हत पृथ्वीवर जन्मलेल्या इत्यादींना देवा म्हटले गेले. अशोकाच्या प्रत्येक अभिलेखात देवानंपिय राजा असे म्हटले गेले आहे. पाली मध्ये देवा या शब्दाचा अर्थ बुद्ध असा आहे. म्हणूनच देवानंपिय राजा हे पाली मध्ये लिहिले असल्याने त्याचा खरा अर्थ बुद्धांचा प्रिय राजा असे आहे. भाषेची ही छोटीशी चूक सुद्धा अशोकाच्या कार्याला वेगळाच अर्थ देऊन जाते. अशोकाची बौद्धधम्मा बद्दलची श्रद्धा, त्याने केलेल्या धम्मयात्रा, संघाला केलेले दान व धम्माची शिकवण या शिलालेखांतून आपल्याला पहायला मिळते. अनेक हल्ले सहन करून हजारो वर्ष अशोकाचे हे शिलालेख, स्तंभालेख आजही टिकून आहे. सम्राट अशोकाची छातीठोक विधाने आहेत. सम्राटाचा स्वतःचा ठाम आवाज आहे, मत आहे, नैतिकतेची शिकवण देणारा हा महान सम्राट आजही शैक्षणिक क्षेत्राला अपरिचितच आहे. भारताचा संस्थापक, राष्ट्रपिता या बिरुदावर त्याचा खरा हक्क आहे. या महान सम्राटाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी बौद्ध धम्माचे प्रतिक असलेल्या धम्मचक्राला राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी मानाचे स्थान दिले. सारनाथ येथे उत्खननात सापडलेल्या अशोकस्तंभावरील सिंहमुद्रा हे राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्थान मिळवून दिले. न्यायपूर्ण व नैतिक शासनाचे ते प्रतीक आहे. खऱ्या अर्थाने बुद्ध धम्माला सम्राट अशोकानंतर ओळख मिळवून दिली ती डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी. अजूनही अशोकाचा शोध सुरूच आहे रोज नवनवीन गोष्टी उत्खननात सापडत आहेत . शेवटी एवढेच की विध्वंसाचे हजारो आघात सहन करून सुद्धा सम्राट अशोक आजही जिवंत आहे.
संदर्भ – ‘अशोक’ भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध – (चार्ल्स ऍलन – अनुवाद — डॉ. धनंजय चव्हाण),
खोए हुए बुद्ध की खोज (लेखक – डॉ. राजेंद्र प्रसाद सिंह)
संकलन :- मिलिंद आशा तानाजी धावारे, लातूर.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments