" न बोलणाऱ्या मुक्यांचा नायक म्हणजेच ‘मूक-नायक ", मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित ३१ जानेवारी १९२०. ("The hero of the mute who does not speak i.e. the 'mook-nayak'", the first issue of the Mooknayak fortnightly was published on 31 January 1920.)
वृत्तसेवा -: ३१ जानेवारी रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकाची सुरुवात झाली. दलितांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम मूकनायक पाक्षिकानं निष्ठेनं केलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते." डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ या आपल्या पाक्षिकाची (दर १५ दिवसाला निघणारे वर्तमानपत्र) सुरुवात केली होती. सुरुवातीला पांडुरंग नंदराम भटकर पाक्षिकाचे संपादक होते. त्यानंतर मूकनायकाच्या व्यवस्थापक पदी असणारे ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे संपादक पदाची जबाबदारी आली. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ‘पूर्वोक्त बहिष्कृत भारत’ ग्रंथात या पक्षिकाचे पहिल्या ३१ जानेवारी १९२० च्या अंकापासून ते २३ ऑक्टोबर १९२० या तारखेपर्यंतचे जे अंक पुनःप्रकाशित केले आहेत. सध्या मूकनायकाचे १९ अंक उपलब्ध आहेत. त्यांत आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केले. मूकनायक या पत्राने सामाजिक व धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे, ही जाणीव निर्माण केली. 'मूकनायक' पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, क्षेम, समाचार, कुशल प्रश्न, शेला पागोटे ही सदरे होती. 'मूकनायक' एप्रिल १९२३ मधे बंद पडले. मूकनायकाच्या ‘सर्वच’ अंकाच्या मुखपृष्ठावर (पहिल्याच पानावर) पाक्षिकाच्या ‘मूकनायक’ या शीर्षकाखाली (मुख्य नावाखाली) आणि प्रत्यक्ष मजकूर सुरु होण्यापूर्वी ‘तुकोबारायांच्या’ एका अभंगाचे दोन चरण असायचे. ज्या अभंगामुळं मोजक्या शब्दात त्या पाक्षिकाचा हेतू काय होता, “आता मी काय म्हणून कुणाची पर्वा करत बसू? इथून पुढं मी सतत बोलत राहणार, यात कसलीही शंका नाही. या जगात न बोलणाऱ्याची बाजू घेणाराच कुणी नाही. शांत राहून, तोंड बंद ठेवून काही साध्य होत नाही. म्हणून तर, बोलायला लाजणाऱ्याचं भलंच होऊ शकत नाही.”
न बोलणाऱ्या मुक्यांचा नायक म्हणजेच ‘मूक-नायक’ या अर्थाचा पाक्षिकाचा हेतू तुकोबांच्या वरील अभंगातील दोनच ओळीत कसा विशाल अर्थानं सामावलेला आहे आणि डॉ. बाबासाहेबांनी प्रेरणेच्या स्वरूपात स्वीकारून पहिल्याच पानावर आपल्या पाक्षिकावर का छापला आहे, हे लक्षात येतं. २० जुलै १९४२ च्या नागपूर येथील भाषणात ते म्हणाले होते, “मी अहिंसेवर श्रद्धा ठेवणारा आहेच, पण
"दया तिचे नाव भूतांचे पाळण ।
आणिक निर्दाळन कंटकांचे ।।"
या तुकाराम महाराजांच्या अहिंसेच्या व्याख्येतील अर्थाने. तुकारामाने अत्यंत समर्पकपणे दोन गोष्टींमध्ये अहिंसा असल्याचे सांगितले. एक- सर्व प्राणिमात्रासंबंधी प्रेम व दया आणि दोन- दुष्ट लोकांचा नाश. अहिंसेच्या व्याख्येतील या दुसऱ्या भागाकडे बहुदा दुर्लक्ष होते व या नजरचुकीमुळेच अहिंसेचे तत्व हास्यास्पद होते. दुष्टांचा विनाश करणे हा अहिंसा तत्वातील महत्वाचा घटक आहे.” अहिंसेची तुकोबारायांनी सांगितलेली दुसरी बाजू म्हणजे, दुष्टांचा सर्वनाश. हा विचार बाबासाहेबांनी घेतला. नव्हे, मला दया ही तुकारामांनी सांगितलेल्या अर्थाची पाहिजे, असंही ते म्हणतात.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
Post a Comment
0Comments