स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जबरी चोरीच्या प्रकरणात दोन आंतरजिल्हा आरोपीना अटक व ३.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त (Local Crime Branch Action: Two inter-district accused arrested and property worth ₹3.14 lakh seized in connection with a robbery case within the jurisdiction of Ramnagar Police Station.)
चंद्रपूर :- शहरात मागील काही दिवसांत घडलेल्या जबरी चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आंतरजिल्हा स्तरावर शोधमोहीम राबवून दोन आरोपींना अकोला जिल्ह्यातून जेरबंद केले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने व साहित्य तसेच चोरीच्या मालमत्तेतून मिळालेली रक्कम असा एकूण ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत चंद्रपूर शहरातील दोन जबरी चोरीचे आणि नागपूर शहरातील एका घरफोडीचा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विविध पथके गठित केली होती. या पथकांकडून शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यासोबतच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू होता. रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप.क्र. १००४/२०२६ मधील जबरी चोरीच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली.
दरम्यान, आरोपी मुस्तफा उर्फ शानू जमील खान याच्याविरुद्ध नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही जबरी चोरी व चोरीसदृश गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले. त्याची अधिक चौकशी केली असता पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून सुमारे ३४ तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहितीची खातरजमा केली असता या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता रामनगर येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाला. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, बजाज पल्सर मोटारसायकल, हेल्मेट, कॉलेज बॅग आणि गुन्ह्यावेळी वापरलेले कपडे असा सुमारे ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीतून प्राप्त रक्कम व इतर मालमत्ता असा सुमारे २ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दुसऱ्या आरोपीकडून हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासासाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक इंधर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे रामनगर पोलीस ठाण्यातील दोन जबरी चोरीचे तसेच नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्यातील एका घरफोडीचा, अशा एकूण तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपींच्या पूर्व गुन्हेगारी इतिहासाची तपासणी सुरू असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या