नागपूर :- शरीरावर धारण केलेले 'स्मार्ट डिव्हाईस' आता तणाव देखील ओळखणार आहे. गणितातील फ्रॅक्टल पद्धतीचा वापर करीत ईसीजी सक्षम नाविन्यपूर्ण प्रणालीचे संशोधन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गणित विभागातील विद्यार्थ्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या या संशोधनामुळे 'स्मार्ट डिव्हाईस' रुग्णालयातील ईसीजीचा आधुनिक पर्याय म्हणून समोर होण्याची शक्यता आहे. गणित विभागातील गौरी मुकेश झाडे आणि बबीता शालिकराम गायधने अशी संशोधक विद्यार्थिनींची नावे आहेत. 'सिस्टीम अँड मेथड फॉर ट्रेस डिटेक्शन इन विअरेबल डिव्हाईस युजिंग हायब्रीड एचआरवी-फ्रॅक्टल फिचर' असे विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पाचे नाव आहे. विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर गणित विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार आणि डॉ. झरीना जोया यांच्या मार्गदर्शनाखाली हा संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. डॉ. प्रीती तायडे यांनी संशोधन प्रकल्प पेटेंट कार्यालयात सादर करण्यास महत्त्वपूर्ण सहकार्य केले. भारतीय पेटेंट कार्यालयाने हा संशोधन प्रकल्प प्रकाशित केला आहे.
झपाट्याने बदलत्या आधुनिक युगात प्रत्येकाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. विविध कारणांमुळे प्रत्येकाला ताण-तणावास सामोरे जावे लागते असल्याचे दिसून येते. या तणावाचे वेळीच निदान अथवा उपचार न झाल्यास त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. वैद्यकीय क्षेत्रात यावर विविध प्रकारची उपकरणे असून त्यामध्ये देखील सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. शरीरातील रक्तभिसरण तपासणीच्या आधारे रक्तदाब मोजला जातो. तर ईसीजीच्या माध्यमातून हृदयातील विद्युत लहरींचे मोजमाप करून हृदयाच्या गतीचा आणि कार्याचा आलेख स्क्रीनवर नोंदविला जातो. हृदयाचे ठोके अनियमित किंवा वाढण्यास बरेचदा तणाव कारणीभूत ठरत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून बोलले जाते. मानसिक आणि शारीरिक तणाव मोजण्यासाठी मानसशास्त्रीय प्रश्नावली, शरीरातील बदलांची तपासणी करण्यासाठी हृदयाच्या ठोक्यांमधील वेळेतील सूक्ष्मबद्दल तपासून स्वायत्त मज्जा संस्थेचा ताण हार्ट रेट व्हेरीएबिलिटी (HRV) चा वापर केला जातो. यावरून तणावाची तीव्रता निदर्शनास येते. विविध हृदयविकारास कारणीभूत ठरणाऱ्या तणावाचे लवकर निदान व्हावे याकरिता गणित विभागातील विद्यार्थ्यांनी हार्ट रेट व्हेरीएबिलिटी (HRV) तपासणीसाठी गणितातील 'फ्रॅक्टल' पद्धतीच्या अवलंब करीत नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित केली आहे. या यशामुळे गणित विभागाच्या संशोधन संस्कृतीला आणि बौद्धिक संपदा निर्मितीला नवे बळ मिळाले आहे. गणित विभागामध्ये विद्यार्थ्यांना संशोधनाभिमुख शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांचे प्रत्यक्ष तांत्रिक समाधानामध्ये रूपांतर करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठेत भर पडली आहे. गणित विभागातील विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन करीत पेटेंट प्रकल्प प्रसिद्ध केल्याने माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खंडाळ, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, गणित विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या