सारनाथ या बौद्ध स्थळाला युनेस्कोचा 'वर्ल्ड हेरिटेज' चा दर्जा, युनेस्को च्या बुसान येथे सुरु असलेल्या अधिवेशनात दिली मान्यता (Sarnath, a Buddhist site, has been granted UNESCO 'World Heritage' status; approval was given at the ongoing UNESCO session in Busan.)
वृत्तसेवा :- भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या पहिल्या धम्मप्रवचनाचे साक्षीदार असलेले सारनाथ हे उत्तर प्रदेशातील वाराणसी जवळचे स्थळ जागतिक वारसा म्हणून घोषित झाले आहे. दक्षिण कोरियातील बुसान येथे सुरू असलेल्या 'युनेस्को'च्या जागतिक वारसा समितीच्या ४८ व्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. 'सारनाथचे भगवान बुद्धांशी अतूट नाते आहे. बुद्धांचा ज्ञान, करुणा आणि सौहार्दाचा कालातीत संदेश आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देत आहे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे. आपण 'प्राचीन बौद्ध स्थळ, सारनाथ' या शीर्षकाखाली २०२५-२६ च्या नामांकन प्रक्रियेसाठी 'युनेस्को'च्या जागतिक वारसा केंद्राकडे प्रस्ताव सादर केल्याचे ऑगस्ट २०२५ मध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले होते.
बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर, गौतम बुद्धांनी सारनाथ येथील मृगदाय वनात पंचवर्गीय भिक्षुनां उपदेश केला. या उपदेशात गौतम बुद्धांनी चार आर्यसत्ये सांगून दु:खातून मुक्ती व निर्वाणाचा मार्ग सांगितला. या स्थळाचे भारतीय समाजमनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाराणसीपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेले सारनाथ हे जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. गौतम बुद्धांनी बोधगया येथे ज्ञानप्राप्तीनंतर इसवी सन पूर्व सहाव्या शतकात आपल्या पाच शिष्यांना पहिला उपदेश (धर्मचक्र प्रवर्तन) याच ठिकाणी दिला. त्यामुळे बौद्ध धर्माच्या प्रसाराची औपचारिक सुरुवात सारनाथमधून झाली, असे मानले जाते. बौद्ध इतिहासात सारनाथला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात येथे स्तंभ, स्तूप आणि विहारांची उभारणी केली. सारनाथमधील अशोक स्तंभाचे सिंहशीर्ष हेच आज भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. राष्ट्रीय ध्वजावरील २४ आऱ्या असलेले अशोकचक्र हेही सारनाथ येथील अशोक स्तंभावर कोरलेल्या धम्म चक्रावर आधारित आहे
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या