कॉक्रोच जनता पार्टीचा दावा; ऑफलाइन परीक्षांची मागणी तीव्र. ऑनलाइन परीक्षांवरून सरकार माघार घेणार? ('Cockroach Janata Party' makes a claim; demand for offline exams intensifies. Will the government back down on online exams?)
नागपूर :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) काही स्पर्धा परीक्षा संगणकाधारित (CBT) ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. यामुळे आयोग आपला निर्णय बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना एक मोठी बातमी हाती आली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी संघटनेने या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन छेडले असून, काही परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. मात्र, याबाबत राज्य सरकार किंवा एमपीएससीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
छत्रपती संभाजीनगर येथे कॉक्रोच जनता पार्टी च्या नेतृत्वाखाली ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर आता नागपूर आणि पुण्यातही मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कॉक्रोच जनता पार्टी नेते अभिजित दिपके यांनी ऑनलाइन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. “विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड होऊ देणार नाही,” असे दिपके यांनी आंदोलनादरम्यान सांगितले. दरम्यान, ऑनलाइन परीक्षा पद्धतीमुळे परीक्षा केंद्रे, तांत्रिक अडचणी, खासगी परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थापन आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत अनेक विद्यार्थी संघटनांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कॉक्रोच जनता पार्टी ने आपल्या निवेदनात, आंदोलनाच्या दबावामुळे सरकार काही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा विचार करत असल्याचा दावा केला आहे. तसेच, हा निर्णय झाल्यास तो विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा विजय ठरेल, असेही संघटनेचे म्हणणे आहे. तथापि, या दाव्याला सरकार किंवा एमपीएससीकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. ऑनलाइन परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थी संघटना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था आणि एमपीएससी यांच्यातील वाद वाढत असून, सरकारची पुढील भूमिका काय असणार याकडे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या