बुध्द पौर्णिमेच्या चांदण्या रात्रीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मचाण गणना : ५,७६५ वन्यजीवांचे निरीक्षण (Machan Census in Tadoba-Andhari Tiger Reserve on the Moonlit Night of Buddha Purnima: 5,765 Wildlife Sightings)
चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने (१ मे २०२६) जलाशयांवरील वार्षिक मचाण गणना उत्साहात पार पडली. उन्हाळ्यात पाणवठ्यांवर वन्यजीवांची वर्दळ वाढत असल्याने त्यांच्या संख्येचा आणि हालचालींचा आढावा घेण्यासाठी ही गणना महत्त्वाची मानली जाते. या उपक्रमात कोअर आणि बफर अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वनविभाग कर्मचारी व नागरिकांचा सहभाग नोंदवला गेला. कोअर क्षेत्रात ९९ मचाण उभारण्यात येऊन २०१ वनकर्मचाऱ्यांनी निरीक्षण केले. तर बफर क्षेत्रात ६९ मचाण उभारण्यात आले असून त्यापैकी ५४ मचाण ऑनलाइन पद्धतीने नोंदवले गेले होते. बफर क्षेत्रात एकूण २१० जणांनी सहभाग घेतला.
मचाण वरून प्राणी गणनेदरम्यान एकूण ५,७६५ वन्यजीवांचे निरीक्षण नोंदवण्यात आले. यामध्ये शाकाहारी प्राण्यांचे प्रमाण सर्वाधिक असून ३,०८९ (५३.६ टक्के) नोंदी आढळल्या. सर्वभक्षी प्राणी १,५०० (२६ टक्के) तर पक्ष्यांची ५७३ (९.९ टक्के) नोंद झाली. मांसाहारी प्राण्यांमध्ये मोठे मांसाहारी २०९ (३.६ टक्के) आणि लहान मांसाहारी २१२ (३.७ टक्के) नोंदवले गेले. प्रजातीवार पाहता, वाघांचे ४२ (कोअर १९, बफर २३) तर बिबट्यांचे १३ (कोअर ५, बफर ८) दर्शन झाले. तसेच चितळ १,७४५, सांबर ६२३ आणि गवा ५४७ अशा मोठ्या प्रमाणात शाकाहारी प्राणी आढळले. याशिवाय नीलगाय, भेकर, रानडुक्कर, अस्वल, कोल्हा, ससा, मुंगूस तसेच मोर व इतर पक्ष्यांचीही लक्षणीय उपस्थिती नोंदवण्यात आली. या आकडेवारीवरून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील परिसंस्था सुदृढ असून भक्ष्य-भक्षक संतुलन चांगले असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला यांनी सांगितले की, या गणनेतून मिळणारी माहिती वन्यजीव संवर्धन, अधिवास व्यवस्थापन व दीर्घकालीन नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या