राज ठाकरेंच वन्यप्राणी प्रेम अवघ्या काही तासात ताडोबात एक-दोन नाही तर १६ पाणवठे तयार, ४० कृत्रिम पाणवठे तयार करणार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष यांचा मानस (Reflecting Raj Thackeray's love for wildlife, not just one or two, but 16 waterholes were created in Tadoba within a mere few hours; the MNS District President intends to establish a total of 40 artificial waterholes.)
चंद्रपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या निदर्शनास आलेला तो व्हिडिओ अवघ्या काही सेकंदाचा होता, पण त्या अवघ्या काही क्षणातच ताडोबाचे चित्र पालटले. मनसेच्या कार्यकर्त्यांना एकच आदेश दिला आणि अवघ्या काही तासात ताडोबात एक-दोन नाही तर १६ पाणवठे तयार झाले. भरदिवसा रस्त्यावर एक हरणाची जोडी पाण्यासाठी भटकत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर सामाईक झाला. हा व्हिडिओ मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला. ताडोबा परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे लक्षात येताच त्यांनी मनसेचे चंद्रपूर येथील जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांना फोन केला आणि परिस्थिती जाणून घेतली. या व्हिडिओने चंद्रपूरच्या जंगलातील उन्हाळ्याची भीषणता समोर आणली. राज ठाकरे यांनी तातडीने मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना देताच मनसे कार्यकर्ते थेट जंगलाच्या दिशेने रवाना झाले. चंद्रपूर जिल्ह्यात मार्चच्या मध्यान्हापासूनच उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमान ४६ अंशापलीकडे गेल्यामुळे जंगलातील अनेक नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. चंद्रपूर वनविभागाने प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत, पण उन्हाच्या तडाख्यामुळे हे वन्यप्राणी जंगलाबाहेर येत आहेत आणि त्याठिकाणी मात्र त्यांना पाण्याचे आणखी दुर्भिक्ष्य जाणवत आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाणवठे कोरडे पडल्यावर वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळतात आणि अशावेळी मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे जंगलाच्या बाहेरही पाणवठे महत्त्वाचे आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अवघ्या दोन दिवस ताडोबा बफर आणि जंगलाच्या सीमेवर तब्बल १६ कृत्रिम पाणवठे तयार केले. या प्रत्येक ठिकाणी नियमित पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाच्या तडाख्यात भटकणाऱ्या वन्यप्राण्यांना या पाणवठ्यांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तब्बल ४० कृत्रिम पाणवठे तयार करणार असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांनी सांगितले. पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव ठेवत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे. उन्हाने होरपळलेल्या जंगलात तहानलेल्या जीवांसाठी उभे राहिलेले हे १६ पाणवठे सध्या चंद्रपूरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे ताडोबा प्रेम जगजाहीर आहे. काही वर्षांपूर्वी ताडोबात वाघांची शिकार उघडकीस आली. त्यावेळीसुद्धा राज ठाकरे यांनी शिकाऱ्यांना पकडण्यासाठी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. याआधीही ते अनेकदा ताडोबात येऊन गेले आहेत आणि वाघच नाही तर इतरही वन्यप्राण्यांची छायाचित्रण त्यांनी केले आहे. हरणांचा व्हिडिओ पाहताच हळहळणारे राज ठाकरे हे वन्यप्राण्यांप्रतीही संवेदनशील असल्याचे या पाणवठ्याच्या माध्यमातून दिसून आले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या