राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार ! 'लाडक्या बहिणी'च्या पदरात काय पडणार? महिलांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता (The state budget will be presented this afternoon! What will be the role of 'Ladkya Bahini'? Big announcements for women are likely)

Vidyanshnewslive
By -
0
राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार ! 'लाडक्या बहिणी'च्या पदरात काय पडणार? महिलांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता (The state budget will be presented this afternoon! What will be the role of 'Ladkya Bahini'? Big announcements for women are likely)

मुंबई :- महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज, शुक्रवारी विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार असून विविध योजनांवरील निधी, महिलांसाठीच्या योजनांतील वाढ आणि शेतकऱ्यांसाठीच्या निर्णयांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 2026-27 या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी दोन वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पात सरकारच्या महत्त्वाच्या योजनांसाठी निधीची तरतूद, नव्या घोषणा तसेच राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत दिशादर्शक निर्णय अपेक्षित आहेत. विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, पायाभूत सुविधा आणि सिंचन प्रकल्पांसाठी किती निधी दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 
           मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात अर्थसंकल्प मांडणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर वित्त खात्याची जबाबदारी फडणवीस यांनी स्वतःकडे घेतली होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत हा दुसरा अर्थसंकल्प ठरणार आहे. यापूर्वी सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानंतर आता अर्थसंकल्पातील तरतुदींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, मार्च 2026 अखेर राज्यावरील कर्जाचा आकडा 9 लाख 32 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मार्च 2025 अखेर हा आकडा 8 लाख 39 हजार कोटी रुपये होता. म्हणजेच चालू आर्थिक वर्षात राज्याच्या कर्जात सुमारे 92 हजार 967 कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे. महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने महसुली तूट वाढण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, 2025-26 साठी राजकोषीय तूट 2.7 टक्के, महसुली तूट 0.9 टक्के आणि राज्याचे कर्ज हे स्थूल राज्य उत्पन्नाच्या सुमारे 18 टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. 
         लाडकी बहीण योजनेवर मोठा खर्च होत असल्याने सरकारला आर्थिक शिस्त काटेकोरपणे पाळावी लागणार आहे. त्यामुळे काही योजनांच्या निधीत कपात होणार का किंवा काही योजना बंद होणार का, याकडेही लक्ष लागले आहे. एकूणच, आज सादर होणारा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महिलांच्या योजनांपासून शेतकरी, पायाभूत सुविधा आणि राज्याच्या आर्थिक स्थितीपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय स्पष्ट करणार असल्याने राज्यभर उत्सुकता वाढली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)