बल्लारपूरात टिम्बर म्युझियम – झायलेरियम स्थापन करणार अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा (Chief Minister Devendra Fadnavis announced in the budget that a timber museum - Xylarium will be established in Ballarpur.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात टिम्बर म्युझियम – झायलेरियम स्थापन करणार अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा (Chief Minister Devendra Fadnavis announced in the budget that a timber museum - Xylarium will be established in Ballarpur.)

आ सुधीर मुनगंटीवार यांच्या संसदीय आयुधांच्या दणक्याचे मोठे यश

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे जागतिक दर्जाचे टिम्बर म्युझियम – झायलेरियम उभारण्याच्या आ सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला यश प्राप्त झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सागवान वारशाचे जतन, संशोधन व जनजागृती करण्यासाठी बल्लारपूर येथे जागतिक दर्जाचे टिम्बर म्युझियम – झायलेरियम उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून हा विषय प्रभावीपणे मांडत बल्लारपूर येथे टिम्बर म्युझियम - झायलेरियम स्थापन करण्याची मागणी सभागृहात ठामपणे मांडली. या चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेत हे म्युझियम उभारले जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. 
         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आ सुधीर मुनगंटीवारांच्या पत्रावर प्रत्यक्ष भेटीत सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश दिले होते. आ सुधीर मुनगंटीवार यांनी संसदीय आयुधांच्या माध्यमातून दिलेल्या दणक्याचे हे यश आहे. विधानसभेत मंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनांचा सातत्याने पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात पूर्ण करून घेण्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हातखंडा मानला जातो. विरोधी पक्षात असतानाही त्यांनी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाकडून करून घेतले होते. त्यामुळे बल्लारपूर येथे टिम्बर म्युझियम - झायलेरियम उभारणीच्या मागणीबाबत देखील ते यशस्वी ठरले आहे.
विधानसभेत या विषयावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकडाची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परंपरा अधोरेखित केली. वनमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट दर्जाच्या सागवानाचा उपयोग देशातील अनेक प्रतिष्ठित वास्तूंसाठी करून दिला होता. अयोध्या येथील श्रीराम मंदिर, नवी दिल्लीतील नवीन संसद भवन, भारत मंडप, पंतप्रधान कार्यालय तसेच केंद्रीय सचिवालय अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या वास्तूंमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सागवानाचा वापर करण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.या परिसरातील सागवानाला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असून त्या समृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी बल्लारपूर येथे टिम्बर म्युझियम – झायलेरियम उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हे म्युझियम आणि झायलेरियम पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरेलच, शिवाय लाकूडशास्त्र, वनसंपदा आणि पर्यावरण अभ्यासासाठी नव्या पिढीसाठी महत्त्वाचे संशोधन व अभ्यासकेंद्र ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी विधानसभेत भाषणा दरम्यान व्यक्त केली होती. वनमंत्री म्हणून कार्य करताना सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागात अनेक दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेत राज्यातील वनव्यवस्थापनाला नवी दिशा दिली. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या वन विभागाला त्यांनी स्वतंत्र ओळख मिळवून दिली. राज्यभर विक्रमी वृक्षारोपण मोहिम राबवून पर्यावरण संवर्धनाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले.मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सुरू केलेली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना अत्यंत प्रभावी ठरली. चंद्रपूर येथे त्यांनी उभारलेली अत्याधुनिक वन अकादमी संशोधन व प्रशिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बांबू क्षेत्राला दिलेली चालना, पंढरपूर येथे उभारलेले तुळशी वृंदावन उद्यान हे अध्यात्म, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम म्हणून ओळखले जाते. पर्यावरण संतुलनासाठी त्यांनी मांडलेली इको पार्क संकल्पना देखील राज्यभरात प्रभावीपणे राबविण्यात आली, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत व जखमी होणाऱ्या व्यक्तीसाठी देण्यात येणाऱ्या रकमेत लक्षणीय वाढ असे विविध निर्णय त्यांनी मंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतले. तसेच चंद्रपूरजवळील ताडाळी येथे सुमारे दहा हजार एकर जागेत फर्निचर क्लस्टर उभारण्याची प्रक्रिया देखील त्यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली आहे. या क्लस्टरमुळे वनाधारित उद्योगांना चालना मिळून स्थानिक रोजगारनिर्मितीला मोठे बळ मिळणार आहे. विधानसभेत अर्धा तास चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या वनमंत्री कार्यकाळातील कामगिरीचे विशेष कौतुक केले. बल्लारपूर येथे टिम्बर म्युझियम - झायलेरियम उभारण्यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव विभागाने शासनाकडे सादर केला असून आता अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा झाल्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग सुकर झाला आहे. आ सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून सागवनाचा ऐतिहासिक वारसा आता जागतिक स्तरावर अधोरेखित होणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)