नागपूर :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात आता परंपरेसोबतच आधुनिकतेचा संगम पाहायला मिळणार आहे. 'राजमाता जिजाऊ' या नावाने तब्बल ३,००० नव्या स्मार्ट बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. या उपक्रमाचा शुभारंभ नागपूर येथून पहिल्या ५० बसच्या माध्यमातून होणार आहे. या विशेष सोहळ्याला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
एसटी महामंडळाने यापूर्वीच 'शिवनेरी', 'शिवशाही', 'शिवाई', 'यशवंती' आणि 'हिरकणी' अशा ऐतिहासिक नावांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच गौरवशाली परंपरेचा विस्तार करत आता 'राजमाता जिजाऊ' या नावाने बससेवा सुरू करण्यात येत आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान अधिक समृद्ध झाला असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी या बसमध्ये अनेक अत्याधुनिक बदल करण्यात आले आहेत. या बसमध्ये ३×२ आसन रचना असून एकूण ५६ प्रवासी बसू शकतील. सध्याच्या बसच्या तुलनेत यात १६ आसने अधिक आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस (GPS) यंत्रणा आणि तातडीच्या मदतीसाठी पॅनिक बटन देण्यात आले आहे. बसमध्ये पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आणि डिजिटल विद्युत मार्ग फलक असतील. या बस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर धावणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. राजमाता जिजाऊ बस सेवा ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून राज्याच्या इतिहासाचा अभिमान आणि आधुनिकतेचा आत्मविश्वास यांचा संगम आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि प्रवासी-केंद्रित होईल.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या