नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 'मानव विज्ञान विद्याशाखेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर (एआय फॉर ह्युमॅनिटीज)' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यापीठ भाषाशास्त्र, परकीय व भारतीय भाषा विभाग आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस (सीआयआयएल) मैसुरु यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर गणित विभागाच्या श्रीनिवासन रामानुजन सभागृहात शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी ही कार्यशाळा पार पडली. माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस (सीआयआयएल) मैसुरुचे संचालक डॉ. शैलेंद्र मोहन, विद्यापीठाचे मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, व्हीएनआयटी नागपूरचे डॉ. उमेश देशपांडे, एलआयटीचे माजी संचालक डॉ. जी. एस. नटराजन, कार्यशाळेचे समन्वयक भाषाशास्त्र, परकीय व भारतीय भाषा विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र कुमार यांची उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी मानव विज्ञान विद्याशाखेत कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय) चा वापर करण्याबाबत आनंद व्यक्त केला. कृत्रिम बुद्धिमत्तेसह कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर होत असताना आपण त्याच्या अधीन जावू नये. तंत्रज्ञानाचा वापर करीत पूर्णतः त्यावर विसंबून राहिल्यास आपली विचारशक्ती नष्ट होण्याची भीती असते. त्यामुळे मानव विज्ञान शाखेत एआयचा नैतिकपणे वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या संस्कृतीतील वारसा प्राप्त तसेच लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या भाषांचे संवर्धन व्हावे याकरिता विद्यापीठात केंद्राची स्थापना केली जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी सांगितले.
सीआयआयएल संचालक डॉ. शैलेंद्र मोहन यांनी मार्गदर्शन करताना सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस भाषा तंत्रज्ञानाचे कार्य करीत असल्याची माहिती दिली. विविध भाषेतील माहिती एकत्रित करीत सीआयआयएल डिजिटल डाटाबेस तयार करीत असल्याचे डॉ. शैलेंद्र मोहन यांनी सांगितले. 'डिझाईन टेक्निक्स फाॅर इंटेलिजंट एजंट्स' या विषयावर बीजभाषण करताना व्हीएनआयटी नागपूरचे डॉ. उमेश देशपांडे यांनी कृत्रिम बद्धिमत्ता (एआय) मॉडेल कशाप्रकारे काम करते, याबाबत त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाषाशास्त्र, परकीय व भाषा विभाग डॉ. शैलेंद्र कुमार यांनी मानव विज्ञान विद्याशाखेतील सर्व अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. एआयचा नैतिकतापूर्ण वापर करीत संशोधन वाढीस चालना मिळेल, असे डॉ. शैलेंद्र कुमार म्हणाले. एआय मॉडेल कशाप्रकारे उपयुक्त असून त्याच्या वापराबाबत संपूर्ण माहिती त्यांनी त्यांच्या भाषणातून दिली. 'एआय इन ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन पॉसिबिलिटी, चॅलेंजेस अँड इथिक्स' या विषयावर जीएलए युनिव्हर्सिटी मथुरा येथील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. रामजनेय कुमार उपाध्याय यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान एलआयटीचे माजी संचालक डॉ. जी. एस. नटराजन यांनी भूषविले. 'बेसिक ऑफ प्राॅम्ट इंजीनियरिंग : हाऊ टू टॉक टू एलएलएमएस' या विषयावर सीआयआयएलचे डॉ. पंकज द्विवेदी यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुबोध बनसोड यांनी भूषविले. समारोपीय कार्यक्रमाला आयक्यूएसी संचालक डॉ. नंदकिशोर करडे, एलआयटीचे माजी संचालक डॉ. जी. एस. नटराजन, भाषाशास्त्र, परकीय व भारतीय भाषा विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र कुमार यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या