अन चंद्रपूरच्या झरपट नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न विधानसभेत गाजला - आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी मांडला प्रश्न (And the issue of the rejuvenation of Chandrapur's Zharpat River created a stir in the Legislative Assembly—MLA Sudhirbhau Mungantiwar raised the matter.)

Vidyanshnewslive
By -
0
अन चंद्रपूरच्या झरपट नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न विधानसभेत गाजला - आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी मांडला प्रश्न (And the issue of the rejuvenation of Chandrapur's Zharpat River created a stir in the Legislative Assembly—MLA Sudhirbhau Mungantiwar raised the matter.)

चंद्रपूर :- चंद्रपूर शहराच्या पर्यावरणीय, धार्मिक व ऐतिहासिक अस्मितेशी निगडित असलेल्या झरपट नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न आज विधानसभेत प्रभावीपणे दुमदुमला. चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आलेला महत्त्वपूर्ण विनंती अर्ज आज सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र विधानसभा सभागृहात अधिकृतरित्या मांडला. झरपट नदीच्या पवित्र तीरावर वसलेली चंद्रपूरकरांची श्रद्धास्थाने श्री अंचलेश्वर मंदिर व श्री महाकाली मंदिर येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र नदीच्या प्रदूषित व अस्वच्छ स्थितीमुळे या पवित्र स्थळांचे पावित्र्य बाधित होत असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याचा धार्मिक पर्यटनावरही विपरीत परिणाम होत आहे. 
           चंद्रपूर ही ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरेची समृद्ध नगरी असून झरपट नदी ही शहराच्या वैभवाची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र मागील काही वर्षांपासून नदीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नदीपात्र अरुंद होणे, मोठ्या प्रमाणात गाळ साचणे, वाढती अतिक्रमणे तसेच सांडपाणी व कचऱ्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होणे या गंभीर समस्यांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिणामी शहराचा पर्यावरणीय समतोल बिघडत असून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका अधिकच वाढला आहे. झरपट नदीचे तातडीने पुनरुज्जीवन झाल्यास शहराच्या पर्यावरणीय समतोलात सुधारणा होईल, भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, पूरस्थितीचा धोका कमी होईल, शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडेल, पर्यटनाला चालना मिळेल तसेच नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होईल. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीही तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, कपात सूचना आदी संसदीय आयुधांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र अपेक्षित कार्यवाही न झाल्याने त्यांनी विधानसभा कामकाजातील अत्यंत प्रभावी समजल्या जाणाऱ्या विनंती अर्ज समितीकडे दाद मागितली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)