बल्लारपूर :- बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था यांच्या पुढाकाराने दिनांक ८ फेब्रुवारी रोजी आयोजित पुरुषांची खुली व्हॉलीबॉल स्पर्धा क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरली. खुल्या गटातील १२ संघ आणि ४५ वर्षांवरील वयोगटातील १० संघांनी या स्पर्धेत सहभाग घेत जिल्ह्यातील व्हॉलीबॉलची ताकद दाखवून दिली. बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, राजुरा, गडचांदूर, तोहगाव, कढोली येथील संघांनी मैदान गाजवले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बल्लारपूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. अलका अनिल वाढई अध्यक्षस्थानी होत्या. माजी नगराध्यक्ष लखनसिंग चंदेल यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिल वाढई यांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून स्पर्धेला औपचारिक सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था व चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद आवते यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. अलका अनिल वाढई यांनी खेळामुळे शारीरिक सुदृढतेसह शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे प्रतिपादन केले. क्रीडा उपक्रमांना सातत्याने पाठबळ देण्याचे आश्वासन देत सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिवसभर चाललेल्या सामन्यांत खेळाडूंनी दमदार कामगिरी सादर केली. ४५ वर्षांवरील वयोगटात बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर लगान स्पोर्टिंग क्लब, भद्रावती संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. भद्रावती संघाचे कर्णधार राजेश मते व प्रशिक्षक विजय सोनवणे यांनी समाधान व्यक्त केले. खुल्या गटात भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या नवोदय स्पोर्टिंग क्लब, भद्रावती संघाने प्रथम पुरस्कारावर आपले नाव कोरले. बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेला द्वितीय, तर पुलगाव स्पोर्टिंग क्लबला तृतीय पुरस्कार मिळाला. पारितोषिक वितरणानंतर आभार प्रदर्शन बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्थेचे सचिव काशीनाथ सिंह यांनी केले. या स्पर्धेला नगरपरिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, नगरसेवक मनोज बेले, माजी नगराध्यक्ष हरिश शर्मा, सेवानिवृत्त प्राध्यापक बलकी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यशस्वी आयोजनामुळे बल्लारपूरमध्ये क्रीडा चळवळीला नवे बळ मिळाल्याची भावना क्रीडाप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या