गोंडवाना विद्यापीठाच्या व बारावी बोर्डाच्या परीक्षा एकाच दिवशी, महाविद्यालयांसमोर दोन्ही परीक्षा एकत्र घेण्याचा पेच, नियमभंगाची शक्यता...! (Gondwana University and the 12th board examinations are scheduled on the same day, creating a dilemma for colleges regarding conducting both exams simultaneously, raising the possibility of rule violations...!)
चंद्रपूर :- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत बी.एड. प्रथम सत्र (फर्स्ट सेमीस्टर) परीक्षेची तारीख आणि बारावीची परीक्षा एकाच दिवशी आल्याने संबंधित महाविद्यालयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंडवाना विद्यापीठाचा बी. एड. चा पेपर १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी नियोजित होती. मात्र ७ व ८ फेब्रुवारी रोजी GATE आणि CTET या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांचे आयोजन असल्याने विद्यापीठाने हा पेपर पुढे ढकलून १० फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, याच दिवशी म्हणजे १० फेब्रुवारीपासून राज्यभर बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये एकाच इमारतीत कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत एकाच दिवशी विद्यापीठ आणि बारावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या, हा प्रश्न महाविद्यालय प्रशासनासमोर उभा राहिला आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान बोर्डाच्या नियमांनुसार केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, चपराशी व प्राचार्य यांच्याव्यतिरिक्त इतर कोणतेही प्राध्यापक अथवा कर्मचारी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे विद्यापीठ परीक्षा घेतल्यास बोर्डाच्या नियमांचा भंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासन, शिक्षण मंडळ व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे. याशिवाय, विद्यापीठाचा पेपर सकाळी ९.३० वाजता सुरू होणार असून बारावीचा पेपर सकाळी ११ वाजता सुरू होतो. बारावीच्या विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजल्यापासून परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जातो. कॉपीमुक्त अभियान अंतर्गत या विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या गोंधळात विद्यापीठाचे विद्यार्थी शांतपणे परीक्षा कशी सोडवणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या