स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, सीटीपीएस मधील ६०० किलो लोखंडी साहित्य चोरीला सहा आरोपींना ताब्यात घेतले (Action by the Local Crime Branch: Six suspects taken into custody for the theft of 600 kg of iron material from CTPS.)
चंद्रपूर :- चंद्रपूर येथील CTPS दुर्गापूर परिसरातून सुमारे ६०० किलो लोखंडी साहित्य चोरी झाल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणातील एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये दुर्गाप्रसाद दुकालु यादव ( वय ४०, रा. सुमित्रानगर, चंद्रपूर ), संजय जोहरी ठाकूर (वय ३१), नारद भगवानसिंग निशाद (वय ४०), नजीर उस्मान शेख (वय ३९), शेख अहमद शेख हसन (वय ४०) आणि शेख इम्रान शेख बिस्मीलाह (वय ३६, रा. तुकूम, चंद्रपूर) यांचा समावेश आहे. यामध्ये एका भंगार व्यावसायिकाचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ताब्यात घेतलेल्या सर्व सहा आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन दुर्गापूर यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या चोरीच्या गुन्ह्यात आणखी काही बाबी समोर येतात का, याबाबत पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी या कारवाईत १५ नग लोखंडी बिटर आर्म हँगर असेम्बली जप्त केल्या आहेत. या साहित्याचे एकूण वजन अंदाजे ६०० किलो असून, त्याची किंमत सुमारे १२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभाग चंद्रपूर पथकाने केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या