बल्लारपूर :- गांधी जयंतीनिमित्त घोषित करण्यात आलेल्या ड्राय डेच्या दिवशी बार सुरू ठेवून ग्राहकांना मद्य उपलब्ध करून देत मद्यपानास जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी श्री. बारवर कारवाई केली. या कारवाईत बारमालकासह वेटर/मॅनेजर आणि मद्यपानासाठी उपस्थित असलेले १८ जन असे एकूण २० जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलीस स्टेशन बल्लारपुर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड हे पोलीस स्टापसह २ ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंग कर्तव्यावर असताना त्यांना श्री बारमध्ये ड्राय डेच्या दिवशी मद्यपान सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने स्टेशन डायरी नोंद क्र. ४५/२०२६ अन्वये घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांना बारच्या बाहेरील खिडकीतून बारमधील वेटर/मॅनेजर ग्राहकांना मद्य उपलब्ध करून देत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत बारमध्ये प्रवेश करून पाहणी केली असता एका खोलीमध्ये एकूण १८ जण मद्यपानाच्या परिस्थितीत आढळून आले. घटनास्थळी मद्याच्या बाटल्या, वापरलेले ग्लास तसेच मद्यपानासाठी वापरलेले अन्य साहित्य आढळून आले. कारवाईदरम्यान बारमालक विशांक उर्फ पुक्की शंकरसिंग सोमबंशी (वय ५०) आणि वेटर/मॅनेजर अजय विलास दडमल (वय २३) यांच्यासह मद्यपानासाठी उपस्थित असलेल्या १८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांना देण्यात आली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पंच यांच्या उपस्थितीत बारमध्ये पंचनामा व जप्तीची कार्यवाही करण्यात आली. कारवाईमध्ये रोख रक्कम ९६०/-रु., ०२ डिजिटल पेमेंट/बारकोड उपकरणे, विविध प्रकारच्या मद्याच्या भरलेल्या बाटल्या, वापरलेले ग्लास, रिकाम्या मद्य व बिअरच्या बाटल्या असा एकूण सुमारे ५,३९०/-रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोर्पीविरुद्ध कलम २२३ भारतीय न्याय संहिता तसेच कलम ६५ (ई), ६८, ८३ व ८२ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्याची कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची कारवाई मा. श्री. बिपिन इंगळे, पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अनिल राऊत यांच्या समन्वयाने तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. उमेश जोगदंड व पोलीस अंमलदार यांच्या सक्रिय सहभागातून व सहकायनि करण्यात आली. गांधी जयंतीनिमित्त घोषित करण्यात आलेल्या ड्राय डेच्या दिवशी नियमांचे उल्लंघन करून मद्यपानास व मद्य उपलब्धतेस प्रोत्साहन देणाऱ्या प्रकारावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये प्रतिबंधात्मक संदेश गेला असून, शासनाने घोषित केलेल्या ड्राय डेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत बल्लारपूर पोलिसांची कडक भूमिका अधोरेखित झाली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या