धक्कादायक...! जिवती तालुक्यात आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना, जेवणात पाल पडल्याचा अंदाज, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर (Shocking...! 31 students from an Ashramshala (residential school) in Jivti Taluka suffered food poisoning; a lizard is suspected to have fallen into the food. All students are in stable condition.)
चंद्रपूर :- जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नगराळा येथील अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी गंभीर प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आश्रमशाळेतील जेवणातून ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. जेवणानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, पोटदुखी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाल्याने एकच खळबळ उडाली. बाधित सर्व विद्यार्थ्यांना तातडीने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांसाठी जेवण तयार करत असताना त्यात पाल पडल्याचा प्रकार घडला. मात्र, याकडे दुर्लक्ष करून तेच अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाढण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. जेवण केल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि भोजनाच्या दर्जाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाच्या स्वच्छतेकडे व सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर तसेच संस्थाचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, विषबाधेने बाधित झालेल्या सर्व ३१ विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांनी दिली. या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होते का, याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या