राज्यस्तरीय आदर्श शिक्षिकेच्या पुरस्कारासाठी झाली होती शिफारस मात्र शिक्षक दिनाच्या अवघ्या दोन दिवस आधी रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू... (She had been recommended for the state-level 'Ideal Teacher' award, but met with a tragic death in a railway accident just two days before Teachers' Day...)
संभाजीनगर :- पैठण तालुक्यातील मुरमा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुमनांजली गेणूजी बनसोडे (५३) यांचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देत, शाळेला आपले घर आणि विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबाचा भाग मानून त्यांनी शिक्षणसेवेत आयुष्य झोकून दिले होते. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी शासनाकडे त्यांची शिफारस करण्यात आली होती. यापूर्वी त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. मात्र, शिक्षक दिनाच्या अवघ्या दोन दिवस आधीच काळाने त्यांना.. हिरावून नेले. सुमनांजली बनसोडे यांनी पैठण तालुक्यातील हर्षी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणसेवेला सुरुवात केली. त्यानंतर आडुळ जिल्हा परिषद प्रशालेत बदली झाली. पुढे लिंबगाव येथे तब्बल पाच वर्षे त्यांनी निष्ठेने सेवा बजावली. शासनाच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत त्यांची नियुक्ती पाचोड केंद्रांतर्गत मुरमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली. मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविला. पाचोडचे केंद्रप्रमुख बळीराम भुमरे यांनी त्यांना कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापिका म्हणून श्रद्धांजली वाहताना, राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची शिफारस करण्यात आली होती; मात्र नियतीने वेगळाच डाव साधला, अशी भावना व्यक्त केली....
भावाला राखी बांधून परतताना काळाचा घाला. मुंबई येथे भावाला राखी बांधून सुमनांजली बनसोडे रेल्वेने परतत होत्या. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नागरसोल ते तारूर रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे किलोमीटर ३०/१४-१५ येथे ही दुर्दैवी घटना घडली.... वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर वॉशबेसिनमध्ये हात धूत असताना रेल्वेला अचानक जोराचा झटका बसला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन त्या धावत्या रेल्वेतून बाहेर फेकल्या गेल्या. प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी तातडीने आपत्कालीन साखळी ओढून रेल्वे थांबवली आणि जखमी सुमनांजली यांच्या मदतीसाठी धाव घेतली. ट्रेन मॅनेजर यांनी नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिल्यानंतर रेल्वे सुमारे दोन किलोमीटर मागे घेण्यात आली. त्यानंतर त्यांना रेल्वेत घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला ज्या शिक्षिकेच्या कर्तृत्वाचा गौरव होणार होता, त्याच शिक्षिकेला पुरस्काराच्या उंबरठ्यावर काळाने हिरावून नेले... ही संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठीच मन हेलावून टाकणारी घटना आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या