छत्रपती संभाजीनगर :- ’डिजीटल मार्केटिंग व पॉलिटिकल पीआर’च्या आजच्या युगात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात एम ए चा अद्यावत अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती विभागप्रमुख डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागामार्फत एम.ए. राज्यशास्त्र अभ्यासक्रमात नव्या काळाशी सुसंगत असे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत अमृतकर यांनी हे सुधारित अभ्यासक्रम विद्यापीठ प्रशासनास सादर केले. नव्या अभ्यासक्रमात "राज्यशास्त्रा तील कृत्रिम बुद्धिमत्ता" (एआय इन पॉलिटिकल सायन्स), "राजकीय मानसशास्त्र", "राजकीय डेटा विश्लेषण", "नेतृत्व सहाय्य" आणि "मतदानशास्त्र व निवडणूक अभ्यास" हे पाच ऐच्छिक विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. बदलत्या शैक्षणिक गरजा, आंतरशाखीय दृष्टिकोन आणि रोजगाराभिमुख शिक्षण लक्षात घेऊन हे बदल करण्यात आल्याचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले. सुधारित अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, निवडणूक अभ्यास, डेटा विश्लेषण, नेतृत्व कौशल्ये आणि राजकीय मानसशास्त्र यांसारख्या आधुनिक व उपयुक्त क्षेत्रांमध्ये ज्ञान व कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. संबंधित अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.प्रशांत अमृतकर यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या