Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

नागपूरच्या दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास सर्वसहमतीने; जागतिक दर्जाच्या सुविधांवर भर (Comprehensive development of Nagpur's Deekshabhoomi with consensus; Focus on world-class facilities)

नागपूरच्या दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास सर्वसहमतीने; जागतिक दर्जाच्या सुविधांवर भर (Comprehensive development of Nagpur's Deekshabhoomi with consensus; Focus on world-class facilities)

नागपूर -: नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासह सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) येथे राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी झालेल्या बैठकीत दीक्षाभूमीचा विकास आराखडा सर्व संबंधितांच्या सहमतीने अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत महानगराचा वाढता विस्तार, नवीन नागपूरची उभारणी आणि देश-विदेशातून दीक्षाभूमीला भेट देणाऱ्या लाखो अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेऊन भविष्यातील गरजा पूर्ण करणारा विकास आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीला साजेसा आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणारा दीक्षाभूमी परिसर उभारण्याचे उद्दिष्ट यावेळी मांडण्यात आले. दीक्षाभूमीचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी वारसा जपणारा असावा, अशी भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली. तसेच 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचावा, यासाठी विकास आराखड्यात विशेष बाबींचा समावेश केला जाणार आहे. पंचशील आणि धम्माच्या मूल्यांचे प्रभावी प्रतिबिंब संपूर्ण परिसरात दिसून यावे, यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, बौद्ध समाजाचे प्रतिनिधी, अभ्यासक आणि समाजातील विविध क्षेत्रांतील चिंतक यांच्या सहभागातून विकास आराखडा अंतिम करण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच विशेष बैठक बोलावून सविस्तर प्रकल्पावर चर्चा केली जाणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दीक्षाभूमीचा विकास आराखडा सर्वसहमतीने आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या