बल्लारपूर -: औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातून मुंबईला व पुण्याला जाण्यासाठी नियमित थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय सुरूच आहे. विविध प्रवासी संघटना, स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन व पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला. केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली रेल्वे सुरु करण्यासंदर्भात आश्वासनही मिळाले, मात्र अद्याप निर्णय प्रत्यक्षात अवतरलेला नाही. पूर्वी मुंबईकडे जाण्यासाठी बल्लारशाह - सेवाग्राम ही महत्त्वाची रेल्वेसेवा होती. मात्र कोरोना काळात ती बंद करण्यात आली आणि त्यानंतर ती पुन्हा सुरू झालेली नाही. सध्या बल्लारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ही एकमेव साप्ताहिक गाडी उपलब्ध आहे, मात्र ती प्रवाशांच्या दृष्टीने अपुरी आणि गैरसोयीची असल्याची तक्रार आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पुन्हा बल्लारशाह-एलटीटी एक्स्प्रेसची घोषणा करण्यात आली होती. रेल्वे बोर्डाकडून या गाडीला क्रमांक देण्यात आला, वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आणि काही लोकप्रतिनिधींनी याचे श्रेय घेण्याची घाई केल्याचेही चित्र दिसून आले. मात्र प्रत्यक्षात या गाडीचा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही. आरक्षण प्रणालीतही ही गाडी उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. घोषणांचा गाजावाजा आणि प्रत्यक्षात शून्य काम, अशी भावना आता नागरिकांमध्ये निर्माण झाली गाडी लवकर सुरू होणार असल्याच्या आश्वासनांमुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र तो आनंद अल्पकाळ टिकला प्रवाशांची अडचण चंद्रपूर, गडचिरोली आणि परिसरातील हजारो नागरिक शिक्षण, रोजगार, वैद्यकीय उपचार आणि व्यवसायासाठी मुंबईकडे प्रवास करतात.
थेट व नियमित रेल्वे नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईच्या काळात मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये होणारी गर्दी पाहता नव्या एक्स्प्रेसची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे. अत्यावश्यक गरज आजच्या घडीला चंद्रपूरसारख्या वाढत्या औद्योगिक व शैक्षणिक जिल्ह्यासाठी मजबूत आणि नियमित रेल्वे संपर्क ही अत्यावश्यक गरज बनली आहे. त्यामुळे बल्लारशाह-एलटीटी एक्सप्रेस केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता लवकरात लवकर प्रत्यक्ष धावू लागावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वीच नांदेड - मुंबई ट्रेन सुरु झाली आहे. एक प्रकारे ही विदर्भाची उपेक्षाच आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या