धक्कादायक ! चंद्रपूरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना, जन्मदात्या मातेनेच पोटच्या मुलांना विक्री करतांना मातेसंह दोन महिलांना अटक तर एक फरार (Shocking! A disgraceful incident that stains the very fabric of humanity has occurred in Chandrapur: a biological mother was caught selling her own children. The mother, along with two other women, has been arrested, while one suspect remains at large.)
चंद्रपूर :- पैशाच्या हव्यासापोटी स्वतःच्याच पोटच्या मुलांची विक्री करणाऱ्या निर्दयी मातेचे धक्कादायक कृत्य चंद्रपूरमध्ये उघडकीस आले आहे. दोन निरागस मुलांना प्रत्येकी दोन लाख रुपयांना विकल्यानंतर या महिलेने आपल्याच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचीही विक्री करण्याचा कट रचला होता. मात्र रामनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा भयंकर डाव उधळला गेला आणि संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिची ओळख अजय फुलझेले याच्याशी झाली. दोघेही महिलेच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दरम्यान, आरोपीची वाईट नजर मुलीवर पडली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला. मुलगी गरोदर राहिल्यानंतर बदनामीच्या भीतीने अजय व आरोपी आईने तिला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.
रुग्णालय प्रशासनाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी पुरात सर्व कागदपत्रे वाहून गेली अशी खोटी कथा रचली व मुलीचे वय २० वर्षे सांगितले. मात्र वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांना संशय आला. डॉक्टरांनी तात्काळ नागपूरच्या अजनी पोलिसांना माहिती दिली. अजनी पोलिसांनी 'झिरो एफआयआर' नोंदवून प्रकरण चंद्रपूर पोलिसांकडे वर्ग केले. रामनगर ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे यांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला असता हा प्रकार केवळ लैंगिक अत्याचारापुरता मर्यादित नसून त्यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय आला. आरोपी आईला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने यापूर्वी आपल्या ८ महिन्या मुलाला कागजनगर तेलंगणा व अडीच वर्षीय मुलाला चंद्रपूर येथे प्रत्येकी दोन लाख रुपयांना विकल्याची कबुली दिली. तसेच अल्पवयीन मुलीच्या पोटी जन्मलेल्या नवजात बाळालाही ती विकण्याच्या तयारीत होती. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपी आईसह बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांना अटक केली आहे. यातील एका महिलेला थेट तेलंगणा राज्यातील कागजनगर येथून तर दुसरीला चंद्रपूरमधून ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अजय फुलझेले सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. चारही आरोपींविरुद्ध मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा व पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके व सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे यांच्या पथकाने केली. फरार आरोपी अजय फुलझेलेच्या अटकेसाठी पोलिसांची पथके सातत्याने छापे टाकत आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या