वृत्तसेवा :- दि. ४ मे २०२६ ला नागपूर खंडपीठाने बी.ए. भाग २ च्या 'मराठी साहित्य' अभ्यासक्रमातील कादंबरी बदलाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देत विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. या निर्णयामुळे ‘ते पन्नास दिवस’ आणि ‘धग’ या दोन्ही कादंबऱ्यांवरून निर्माण झालेला वाद तात्पुरता निकाली निघाला आहे. मराठी अभ्यास मंडळाने बी. ए. भाग २ च्या सत्र ४ साठी 'विशेष वाङ्मय प्रकार : कादंबरी' या पत्रिकेसाठी ‘ते पन्नास दिवस’ ही पवन भगत यांची कादंबरी समाविष्ट केलेली होती. या कादंबरीच्या माध्यमातून कोरोना काळातील श्रमिकांचे, कामगारांच्या स्थलांतरातून त्यांना सोसाव्या लागणाऱ्या यातनांचे वास्तव चित्र विद्यार्थ्यांना कळावे आणि त्यांच्या जीवनजाणिवा अधिक समृद्ध व्हाव्यात हा त्यामागील उद्देश होता. संकटाच्या काळात जात, धर्म, पंथ, पक्षभेद गळून पडतात आणि माणुसकी हा एकच धर्म शिल्लक राहतो याचे एक उदात्त चित्रण या कादंबरीतून रेखाटले आहे. या कादंबरीत कोणत्याही व्यक्तीचा किंवा पक्षाचा उल्लेख नसताना सुद्धा आमच्या नेतृत्वावर या कादंबरीत टीका करण्यात आली आहे असा कांगावा काही लोकांनी केला. ९ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी अभ्यासक्रमातून वगळण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावर सविस्तर चर्चा होऊन हा विषय पुनर्विचारासाठी मराठी अभ्यास मंडळाकडे पाठविण्यात यावा असे विद्या परिषदेच्या सभेत ठरले. विद्यापीठ प्रशासनाने तब्बल तीन महिन्यानंतर ९ मार्च २०२६ रोजी मराठी अभ्यास मंडळाची सभा आयोजित केली. मराठी अभ्यास मंडळाच्या बैठकीत सर्व सदस्यांनी एकमताने ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी अभ्यासक्रमात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र २ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत या कादंबरीवर दोन्ही बाजूंनी पुन्हा चर्चा झाली. एकमत होत नसल्याने मा. कुलगुरू यांनी सदर विषय सभागृहात मतदानासाठी टाकला. त्यात २२ विरुद्ध ८ मतांनी ही कादंबरी वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेत मराठी अभ्यास मंडळाची तातडीची बैठक घेऊन ते 'पन्नास दिवस' या कादंबरीला पर्याय कादंबरी सुचवावी असाही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ४ एप्रिल २०२६ रोजी मराठी अभ्यास मंडळाच्या तातडीच्या बैठकीत विद्यार्थ्यांचे हित व सदर कादंबरी शिकवण्याकरता असलेला सीमित कालावधी लक्षात घेता ‘धग’ ही कादंबरी पर्याय म्हणून सुचवण्यात आली. त्याच दिवशी विद्यापीठाने अधिसूचना काढून अभ्यासक्रमात ‘धग’ कादंबरीचा समावेश केल्याचे सर्व महाविद्यालयांना कळविले.
मात्र, परीक्षेच्या केवळ चार आठवडे आधी अभ्यासक्रमात झालेल्या या बदलामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत, विद्यार्थ्यांना कोणताही अन्याय होऊ नये यासाठी संतुलित भूमिका घेतली. ४ श्रेयांकांसाठी असणारी ही कादंबरी शिकवण्याकरता नियमानुसार १५ आठवड्यात ६० तास उपलब्ध असणे आवश्यक आहे हे निरीक्षण न्यायालयाने विद्यापीठाच्या लक्षात आणून दिले. आणि आता तेवढा कालावधी नसल्याने न्यायालयाने 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी सत्र २०२५- २६ वर्षाच्या परीक्षेसाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने विद्यापीठाला निर्देश दिले की, विद्यार्थ्यांना ‘ते पन्नास दिवस’ किंवा ‘धग’ यापैकी कोणत्याही कादंबरीवर परीक्षा देण्याचा पर्याय द्यावा. त्यासाठी तात्काळ परिपत्रक काढून सदर निर्णय विद्यार्थ्यांना कळविण्याचा असा आदेश देण्यात आला. तसेच, प्रश्नपत्रिका दोन्ही कादंबऱ्यांवर आधारित तयार करून विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडीप्रमाणे परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, अभ्यास मंडळांनी विचारपूर्वक घेतलेले निर्णय विद्यापरिषदेने केवळ बहुमताच्या आधारे बदलणे हे दीर्घकालीन दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकते. सदर प्रकरण हे त्याचे ठळक उदाहरण मानले जात आहे. या लढ्यात मराठी अभ्यास मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य आणि आपण सर्व प्राध्यापक बंधु-भगिनी यांनी जे नैतिक बळ दिले त्याबद्दल आपणां सर्वांचे मनःपूर्वक आभार ! प्रा. डॉ. काशीनाथ बऱ्हाटे अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या