Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

करामती झुरळ जनता पार्टी, स्वाभिमानाने उठली कार्टी (The Miraculous Cockroach People's Party—the youngsters have risen with pride !)

करामती झुरळ जनता पार्टी, स्वाभिमानाने उठली कार्टी (The Miraculous Cockroach People's Party—the youngsters have risen with pride !)


वृत्तसेवा :- सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणाईच्या जिव्हारी लागणारी हेटाळणी केली. त्या जखमेवर "नीट" परीक्षेच्या पेपरफुटीचं मीठ पडलं. यातून हिंगोलीच्या अभिजित दिपके ह्या तरुणाने "कॉक्रोच जनता पार्टी" जन्माला घातली. गमतीचा हा मामला "मोदी सरकार"ने गंभीरपणे का घेतलाय ? देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीत, बेरोजगार तरुणाईला "कॉक्रोच" (झुरळं) आणि पॅरासाईट (बांडगुळं) अशा उपमा दिल्या. ते म्हणाले, "ही मंडळी 'माहिती अधिकारा'चा आणि 'सोशल मीडिया'चा (एल्फ्लुएंझर म्हणून) वापर करून आंदोलनं पेटवतात. देशापुढे धोका निर्माण करतात." सूर्य कांत हे देशाचे सरन्यायाधीश असले तरी, सत्ताधीशाला "तू गुन्हेगार आहेस; तुला देहान्ताशिवाय दुसरे प्रायश्चित नाही," असे ठणकावून सांगणाऱ्या पेशवाईतल्या रामशास्त्री प्रभुणे यांचे अवतार नाहीत. "हरामशास्त्री" उपाधीला साजेसा त्यांचा इतिहास आहे. तो त्यांची सहा महिन्यांपूर्वी सरन्यायाधीश पदावर नेमणूक झाली तेव्हा उगाळला गेला होता. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर टीका होताच, त्यांनी "मी फेक डिग्रीवाल्यांबद्दल बोललो. देशातील युवकांबाबत मी आशावादी आहे," अशी सारवासारव केली. ती पचनी पडावी, असे वर्तमान देशात तयार झाले नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागताच, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यापूर्वीच्या अमेरिका- इस्त्राएल आणि इराण यांच्यामधील युद्धाच्या परिणामांचा हवाला देत; "आणीबाणी"ला साजेशा इंधन बचतीच्या आणि अन्य सूचना दिल्या. त्याने जनता खवळली. "मोदी सरकार" विरोधात बोलू लागली. त्यात प्रधानमंत्रींनी युरोप दौऱ्यातील नॉर्वे देशात महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. ते भारतासाठी अपमानास्पद होते. "पत्रकारिता स्वातंत्र्य"च्या यादीत नॉर्वे हा "क्रमांक एक"चा देश आहे ; तर भारत आज १५७ व्या क्रमांकावर आहे. हे चित्र बदलवण्याची संधी नरेंद्र मोदी यांना मिळाली होती. त्यांना "आपला प्रश्न योग्य जागी विचारा," असं म्हणून प्रश्नाकर्त्या पत्रकाराला जबाबदारीचे भान देता आले असते. पण ते प्रश्नापासून पळ काढावा, तसे सटकले. त्यांचे हे वागणे "भारतीय पत्रकारिता" सत्तेची शरणागत आहे; यावर शिक्कामोर्तब करणारे ठरलेय. जागतिक स्तरावर भारताचे असे विचित्र चित्र रंगत असतानाच; वैद्यकीय (मेडिकल) शिक्षणासाठी देश पातळीवर एकमेव असलेल्या "नीट" (NEET) परीक्षेचे पेपर फुटले आणि ते लाखो रुपयात विकले गेल्याचे प्रकरण जाहीर झाले. वैद्यकीय पदवीसाठीच्या देशभरातील १ लाख २९ हजार ६०६ जागांसाठी देशभरातून २२ लाख विद्यार्थी ह्या प्रवेश परीक्षेसाठी बसले होते. आरोपींची धरपकड होताच पेपर फुटीची व्यापकता स्पष्ट झाली. सरकारने परीक्षा रद्द करून सदर परीक्षेसाठी २१ जून ही परीक्षेची तारीख जाहीर करताच, कोचिंग क्लासेसनी "उजळणीच्या वर्गांचे पॅकेज" जाहीर केले. दरम्यान, पुन्हा परीक्षा देण्याच्या धसक्याने तीन परीक्षार्थींनी आत्महत्या केली. सरकारी यंत्रणा, कोचिंग क्लासेस आणि धनाढ्य पालक यांच्या संगनमताने निर्माण झालेल्या रॅकेटमधून पेपरफुटीचे प्रकरण तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांत पाच वेळा आणि आता सलग तीन वर्षे "नीट" परीक्षेचे पेपर फुटलेत. अनेक सरकारी परीक्षांत, गेली काही वर्षं असेच घडतंय. ह्यात कसोशीने अभ्यास करणाऱ्यांचा प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता वाया जाते. 'स्पर्धेतील समान संधी' ह्या लोकशाही मूल्यांचा पराभव होतो. गरीब परीक्षार्थी मेहनत घेऊन अभ्यास करतो; आणि श्रीमंत व्यवस्थाच विकत घेतो, अशी भावना समाजात निर्माण होणे अत्यंत धोकादायक आहे. पण तसेच झाले आहे. अशा धोकादायक परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या तरुणाईची "झुरळ" किंवा "बांडगूळ" म्हणून हेटाळणी करणे, हे आगीत पेट्रोल टाकल्यासारखेच ठरणार आपल्या देशात दरवर्षी ५० लाख मुलं-मुली पदवीधर होतात. त्यांच्या नोकरी- धंद्याची कोणती व्यवस्था गेली १२ वर्षे सत्तेवर असणाऱ्या "भाजप सरकार"ने केलीय? देशाची सत्ता मिळवण्यासाठीच्या प्रचारात "दोन कोटी नोकऱ्या निर्माण करू," अशा बाता नरेंद्र मोदी आणि "भाजप"ने मारल्या होत्या. प्रत्यक्षात नोटाबंदी, कोरोना- लॉकडाऊन आणि खाजगीकरणाच्या फटकाऱ्यात देशातील साडेतीन कोटी नोकऱ्या संपवल्या. गुणवंतांना जे हवं ते शिकण्याची संधी नाही आणि गरजवंतांच्या हाताला काम नाही! अशी स्थिती निर्माण करणाऱ्या व्यवस्थेला गुणवंत- गरजवंत बेरोजगार माहितीच्या अधिकारात जाब विचारणारच ना? कारण -
पोटातल्या आणि डोक्यातल्या,
 भुकेची आग शमता शमत नाही!
अंधारलेल्या डोळ्यांना कधी,
स्वातंत्र्याचा कवडसा दिसत नाही!!
हक्क कशावर सांगावा, 
तर हक्काचं काहीच नसावं!
संस्कृतीचं मढं मात्र,
रोजच्या रोज सजवावं!!
    ह्या कवी राहुल तूपलोंढे यांच्या कवितेतील ओळी भोवताली अनुभवायला येत असतील; बेरोजगार तरुणांपेक्षा कमी शिक्षित लोक "मसल आणि मनी"च्या जोरावर लोकप्रतिनिधी म्हणून मिरवत असतील; तर त्यांच्या हरामखोऱ्या माहितीच्या अधिकारात का नाही उघड करायच्या? २०१४ पासून "मोदी सरकार" सत्तेवर आहे. त्यापूर्वी देशात ८० कोटी लोकं मोफत धान्यावर जगत होते का? सूक्ष्म व छोटे उद्योग व्यवसाय कसे बंद पडले आणि 'मॉल' व त्याच्या चेन्स उभ्या करून छोटे उद्योग, दुकानदार आणि व्यापारी कोणी उद्ध्वस्त केले? 'एमआयडीसी' भकास का झाल्या? देशाची खनिज संपत्ती मोजक्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात कोणी घातली?सायकलवरून फिरणारा रामदेवबाबा आज हजारो कोटी रुपयांत कोणाच्या बळावर खेळतोय? "नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल" (NCLT) स्थापन करून कॉर्पोरेट कंपन्यांची २५ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी करून काय साधले? फायद्यात चालणाऱ्या सरकारी कंपन्या जागेसह कॉर्पोरेट कंपन्यांना विकून किती अधिक संख्येने रोजगार निर्माण झाले? "ॲग्रीकल्चर सेक्टर"मध्ये कॉर्पोरेट कंपन्यांना घुसवून जनतेला त्यांच्याच पैशाने "सरकारी लाभार्थी" बनवणे, ही चलाखी नाही का? "पी.एम. केअर फंड"मध्ये जमा झालेल्या अब्जोवधी रुपयांचे काय झाले? असे प्रश्न सरकार वा व्यवस्थेला विचारणे, हे भारतीय नागरिकांचे देशभक्त म्हणून कर्तव्यच आहे! हे प्रश्न विचारणाऱ्याला "झुरळ" म्हणून झटकता येणार नाही; किंवा "बांडगूळ" म्हणून दुर्लक्षितही करता येणार नाही.
              सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सारवासारव केली तरी, ते "झुरळ" आणि "बांडगूळ" हे शब्द पुसू शकले नाही. ह्या शब्दांतून तुच्छता प्रदर्शित होते. "ढेकणासारखे चिरडून टाकू .... झुरळासारखे झटकून टाकू," हे शब्दप्रयोग अधिकाराचा अतिरेकी माज दाखवणारे आहेत. "पॅरासाईट" ऊर्फ "बांडगूळ" म्हणजे परजीवी! मोठ्या झाडावर बांडगूळ उगवतं. ते परपोषित म्हणजे मूळ झाडापासून आपल्या अन्नासाठीचा जीवनरस शोषतं. यावर ते इतकं वाढतं आणि पसरतं की, त्याने मूळ झाड झाकोळून जातं. वाढती बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि मानवाधिकाराची गळचेपी या समस्या मांडणारे सरन्यायाधीशांना झुरळ- बांळगुळासारखे का वाटावेत? त्याने विकसित भारताची ओळख झाकोळून जाते का? का, "विश्वगुरूची प्रतिमा झुरळसम्राटासारखी होते? तसे असेल तर झुरळ व बांडगूळ यांची पैदास कोणाच्या नालायकीमुळे झाली, ह्याचा अभ्यास सरन्यायाधीशांनी केला नसावा. तसेच,"तरुण पिढीबद्दल असे बोलायला नको होते," असे सरन्यायाधीशांना सुनावण्याची धमक "मोदी सरकार"कडे उरली नसावी. त्यामुळेच "कॉक्रोच जनता पार्टी"च्या माध्यमातून तरुणाईंसह जनतेचा संताप मोठ्या प्रमाणात व्यक्त झाला. ह्याला कारण, सत्ताधारी पक्ष संसद- विधिमंडळामध्ये सत्ता बळाने विरोधकांना झुकवतात. हेच पोलीस यंत्रणा, न्यायपालिका, प्रसारमाध्यमं यातून होताना दिसते. ह्यात दुरुस्ती होण्याऐवजी जनतेची सहनशक्ती वाढवणारे कारनामे सरकार करते, असाही अनुभव जनतेला येऊ लागलाय. "नीट" परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात खैरनार, कुलकर्णी, मोटेगावकर, मांढरे, हवालदार, वाघमारे अशी आडनावं जाहीर झाली. यावर, "ह्यात मुस्लीम नाव असते, तर हे प्रकरण सरकारला 'पेपर लीक जिहाद ' म्हणून खपवता आले असते," असं लोक बोलू लागलेत. ह्याचा अर्थ, जनतेने आता "भाजप- संघ सरकार"च्या कारभाराला पुरते ओळखले आहे! म्हणूनच झुरळ, बांडगूळ या शब्दातील तुच्छता जनतेच्या जिव्हारी लागली. हे शब्द सरन्यायाधीशांचा तोंडून आले असल्याने, ते निश्चितच अज्ञानातून आलेले नाहीत. या शब्दांना तुच्छतेचा इतिहास आहे. हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर (जन्म : २० एप्रिल १८८९; मृत्यू : ३० एप्रिल १९४५) याच्या नेतृत्वाखालील जर्मनीत अति-उजवी आणि कट्टर राष्ट्रवाद जोपासणारी "नाझीझम" (नाझीवाद) नावाची राजकीय विचारधारा उदयास आली. हिटलर व नाझीवादी हे "जर्मन आर्य वंश" हा सर्वश्रेष्ठ व शुद्ध आहे," असं म्हणत स्वतःचा गौरव करून घेत; आणि उर्वरित ज्यू व काळ्या रंगाच्या अल्पसंख्याकांना कनिष्ठ ठरवून तिरस्कार करीत. त्यांना "उंदीर" किंवा "बांडगूळ" म्हणत अपमानित करीत. (जसं आजही मागास जाती- जमाती आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना "सरकारी जावई" किंवा "भीमटे" म्हणतात तसं.) जर्मनीतल्या समस्यांचे मूळ हे ज्यू लोकच आहेत, असं ठरवून हिटलर व नाझींनी लाखो ज्यूंची क्रूरपणे हत्या केली.
          १९९४ च्या एप्रिल ते जुलै महिन्यात रवांडामध्ये झाले. रवांडा हा पूर्व आफ्रिकेतील छोटा विकसनशील देश! त्याच्याभोवती टांझानिया, बरुंडी, युगांडा, काँगो हे देश आहेत. ६ एप्रिल १९९४ रोजी रवांडाचे तेव्हाचे राष्ट्रप्रमुख जुवेनल हब्यारीमाना यांचा विमान कोसळून मृत्यू झाला. ते तिथल्या "हूतु" (Hutu) या बहुसंख्याक जमातीचे होते. त्यांचा अपघात हा घातपात आहे, असा प्रसार "हूतु पॉवर" ह्या कट्टरतावादी संघटनेने सुरू केला आणि अल्पसंख्याक असलेल्या "तुत्सी" (Tutsi) समाजावर हत्येचा आरोप ठेवला. त्यानंतर सरकारी यंत्रणा, सैन्य आणि "हूतु" नागरिकांनी मिळून १०० दिवसांत ८ लाख "तुत्सी" लोकांची हत्या केली. या संहारासाठी सरकारी रेडिओवरून "तुत्सींना झुरळासारखे चेचून संपवा," असे उघड आवाहन करण्यात आले होते. त्यासरशी शेजारी व नातेसंबंध याचा विचार न करता तुत्सींचे धारदार हत्यारांनी शिरकाण करण्यात आले. भारतात असे होणार नाही; होऊही नये! अगदी श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश मधल्या "जेन झी"च्या उद्रेकासारखेही होऊ नये. कारण, भारत हा शून्यालाही "अर्थ"पूर्ण करणाऱ्यांचा देश आहे!( प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट (इ.स. ५ वे शतक) यांनी दशमान स्थान-मूल्य पद्धतीचा शोध लावताना "शून्य"ला संख्या म्हणून मान्यता मिळवून दिली. ह्या शून्यामुळे कितीही मोठ्या संख्या लिहिणे आणि त्यावर गणिते करणे अतिशय सोपे झाले. शून्याच्या शोधासोबतच भारताने जगाला दशमान स्थान-मूल्य पद्धतही दिलीय. ह्या बळावरच गेल्या १२ वर्षात "मोदी सरकार"ने भारताच्या डोक्यावरचे "वर्ल्ड बँके"चे कर्ज कित्येक पटीने वाढवले आहे. भारत सध्या "वर्ल्ड बँके"चा नंबर वन कर्जदार असून कर्जाची रक्कम २४९ लाख कोटी रुपये झाली आहे. होऊ दे. तर -) शिवरायांनी शून्यातून इतिहास घडवला; म्हणून स्वराज्य- समता- स्वातंत्र्य- संविधान असा भारताला "सार्वभौम राष्ट्र" करणारा प्रवास देशाने पूर्ण केला. हा प्रवास प्रचंड संघर्षाचा आहे. त्यामुळे सरन्यायाधीशानांही बेरोजगार तरुणाईला झुरळ- बांडगूळ म्हणून तुच्छतेने वागवता येणार नाही. हेच सांगण्यासाठी २९ वर्षांच्या अभिजित दिपके याने "कॉक्रोच जनता पार्टी"ला सोशल मीडियावर व्हायरल केलं. यातून तरुणाईचा राग एकत्र झाला आणि अवघ्या चार दिवसांत "कॉक्रोच जनता पार्टी"च्या हँडलवरील फॉलोअर्सचा आकडा "भाजप" (८० लाख ७० हजार) "राष्ट्रीय काँग्रेस" (१ कोटी ४० लाख) यांना ओलांडून २ कोटीच्यावर गेला. तुच्छतावादाला स्वाभिमानाने उत्तर दिले. "राजा हरिश्चंद्र आणि तारामती"ची पुराण कथा आहे. हरिश्चंद्र स्वप्नात दिलेल्या वचनानुसार, ऋषी विश्वामित्राला आपले राज्य, संपत्ती आणि सर्वकाही दान करतो. पोटासाठी स्मशानातील चांडाळाकडे लाकूड फोडण्याचे काम करू लागतो. तिथेही त्याची परीक्षा सुरूच असते. जेमतेम एका भाकरीचे पीठ घेता येईल, इतकीच त्याची कमाई होते. तो थकतो, तसे त्याच्यापुढे मरण उभे ठाकते. एक भाकर तयार होईल, इतकेच पीठ शिल्लक असते. त्यातून बनवलेल्या भाकरीचे तारामती चार चतकोर करते. एक हरिश्चंद्रापुढे, एक आपल्यापुढे आणि एक बाहेर गेलेल्या रोहिदाससाठी ठेवते. एक चतकोर उरतो. तो कुणासाठी ठेवायचा, ह्याचा विचार करते. एका दिवसाने हरिश्चंद्राचे; दोन दिवसांनी तारामतीचे; आणि तीन दिवसांनी रोहिदासचे मरण ठरलेले असते. ती हरिश्चंद्रापुढे उरलेला चतकोर ठेवू पाहते; तोच हरिश्चंद्र तिला अडवत म्हणतो, "ह्या जास्तीच्या चतकोराचा मला काय उपयोग? रोहिदास आपल्यापेक्षा दोन दिवस अधिक जगणार आहे. त्याच्यासाठी अधिकचा चतकोर ठेव!" तारामतीला ते पटते. रोहिदासच्या वाट्याला दोन चतकोर होतात. तारामती म्हणते, "मला उपासाची सवय आहे. उद्या तुम्ही जाणार, ह्या दुःखाने मला काही खावंसं वाटत नाही!" असं म्हणत तारामती आपल्या पुढचा चतकोर रोहिदासच्या वाट्याच्या अर्ध्या भाकरीवर ठेवते. त्याबरोबर हरिश्चंद्र म्हणतो, "माझ्यापाठोपाठ तूही जाणार, याचं दुःख मलाही आहे. काही खावंसं वाटत नाही!" असं म्हणत तो आपल्या चतकोराने रोहिदासच्या वाट्याची भाकर पूर्ण करतो. हा संवाद रोहिदासने आडोशाला उभे राहून ऐकलेला असतो. तो पुढे येत म्हणतो, "आई- बाबा, तुम्ही माझ्या पोटाच्या भुकेची जितकी काळजी करता; तितकी काळजी माझ्या स्वाभिमानाची कधी करणार? माझ्या स्वाभिमानाच्या आड हे पोट येत असेल, तर हे पोट मी फेकून देतो!" ज्या देशात स्वाभिमानासाठी पोट फेकून देणारी तरुणाई असते; त्या देशाला भिकेचे डोहाळे लागत नाही. ह्याचाच साक्षात्कार सध्या अमेरिकेत शिक्षणासाठी राहात असलेल्या हिंगोलीच्या अभिजित दिपके याने घडविला आहे. त्याच्या धाडसाला देशातल्या तरुणाईने भरभरून साथ दिलीय. "कॉक्रोच जनता पार्टी"चे सोशल मीडिया हँडल त्याने गंमत म्हणून सुरू केले. त्याच्यात जे लिहिलेले, दाखवले ते उपहासात्मक आहे. "आळशी आणि बेरोजगार तरुणांचा आवाज" हा त्याचा पुरावा आहे. पण त्यातून देशापुढचे गंभीर प्रश्न जगजाहीर झालेत. त्यापुढे "अभिजित पूर्वी कुठल्या पक्षाचा प्रचारक होता? आता त्याला कोण पाठिंबा देतोय?" हे प्रश्न निरर्थक ठरतात. त्याच्या गमतीला गंभीरपणे घेऊन त्याच्यामागे दोन राष्ट्रीय राजकीय पक्षांपेक्षा अधिक पाठीराखे उत्स्फूर्तपणे उभे राहिले; आळशी कार्टी स्वाभिमानाने उठली, हेच महत्त्वाचे आहे. उत्स्फूर्ततेला स्वतःची अशी कार्यशक्ती असते. ती आलेल्या अनुभवातून तयार होते. ती संपवणाऱ्यालाच संपवून टाकते. अशक्य ते शक्य करते. अंधार खूप आहे. तो दूर करायचा तर प्रकाश पाहिजे. हा प्रकाश देण्याचं सामर्थ्य जर इतिहासात, जाती - धर्मवादात, संस्कृतीत, जागृत देव- देवतांत किंवा स्वतःला 'विष्णु अवतारी' म्हणवून घेणाऱ्या प्रधानमंत्रींमध्ये असते; तर अंधारच झाला नसता!म्हणून प्रकाशासाठी सामाजिक - राजकीय जाण-भान असणाऱ्यांनी अंधाराला संकट न मानता त्याचे आभार मानले पाहिजे. तरुणांसाठी ही आपलं आयुष्य प्रकाशमान करण्याची संधी आहे. उद्याची ही आशा निराशा करणारी नसेल. कारण तरुणाईच्या बुद्धी भांडारात विज्ञान- तंत्रज्ञानाचा दिवा पेटत असेल. तो पेटला असेल तर चर्चेत शक्ती- काळ घालवण्याऐवजी थेट कामाला लागा. ऑनलाईन विचार, आचरणात आणा. भारत हा तरुणांची देश असल्याचे दाखवून द्या !

अतिथी मार्गदर्शक -: ज्ञानेश महाराव (ज्येष्ठ पत्रकार व संपादक)

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या