बुध्द पौर्णिमा, विश्व कामगार दिवस व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बल्लारपूरात पत्रकारांचा भव्य सत्कार संपन्न (A grand felicitation ceremony for journalists was held in Ballarpur on the occasion of Buddha Purnima, International Workers' Day, and Maharashtra Day.)
बल्लारपूर :- महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस, विश्व कामगार दिवस आणि बुद्ध पूर्णिमा या त्रिसंयोगी पावन दिनानिमित्त पत्रकारांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. शासकीय विश्रामगृहात आयोजित या कार्यक्रमात पत्रकारिता व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव खेडेकर होते. प्रमुख उपस्थितांमध्ये दैनिक भास्करचे उपसंपादक सुरेश वर्मा, दैनिक नवभारतचे उपसंपादक एजाज अली, भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव पत्रकार अजय दुबे, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर, नगर परिषद बल्लारपूरचे उपाध्यक्ष पत्रकार देवेंद्र आर्य तसेच दैनिक लोकवाराचे उपसंपादक नारदप्रसाद ठाकुर यांचा समावेश होता.
अध्यक्षीय भाषणात पत्रकार वसंतराव खेडेकर म्हणाले की, आज सन्मानित झालेल्या सर्व पत्रकारांनी आपल्या लेखणीद्वारे समाजाला दिशा दिली आहे. हा सन्मान त्यांच्या जबाबदारीत अधिक भर घालणारा आहे. तर नारदप्रसाद ठाकुर यांनी, वाढदिवसानिमित्त मिळालेला हा सन्मान अविस्मरणीय असून निष्पक्ष पत्रकारिता कायम ठेवण्याचा प्रयत्न करेन, असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या समाजातील महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करते, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान दैनिक लोकवाराचे उपसंपादक नारदप्रसाद ठाकुर यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थितांनी केक कापून त्यांना शुभेच्छा देत उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या. उपसंपादक सुरेश वर्मा यांनीही या तिन्ही पावन दिवसांवर मिळालेल्या सन्मानामुळे अधिक प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल डूबेरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिसरातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या