चंद्रपूरच्या प्रगतीचा पाया पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनामुळेच भक्कम, आ.मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कर्तृत्वाचा केला गौरव; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचेही केले स्वागत (The foundation of Chandrapur's progress is robust precisely due to transparent and people-centric administration; MLA Mungantiwar lauded the exemplary performance of Collector Vinay Gowda and also extended a warm welcome to Collector Vasumana Pant.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरच्या प्रगतीचा पाया पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनामुळेच भक्कम, आ.मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कर्तृत्वाचा केला गौरव; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचेही केले स्वागत (The foundation of Chandrapur's progress is robust precisely due to transparent and people-centric administration; MLA Mungantiwar lauded the exemplary performance of Collector Vinay Gowda and also extended a warm welcome to Collector Vasumana Pant.)

चंद्रपूर :- ‘प्रशासन जोपर्यंत पारदर्शी, लोकाभिमुख आणि सक्षम होत नाही, तोपर्यंत जिल्ह्याची प्रगती शक्य नसते. चंद्रपूर जिल्ह्याने यासंदर्भात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. पारदर्शी, लोकाभिमुख आणि सक्षम प्रशासन हाच चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीचा भक्कम पाया ठरला आहे,’ असा विश्वास व्यक्त करत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाचा गौरव केला. अक्षय तृतीयेच्या पावन मुहूर्तावर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी जी. सी. विनय गौडा यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. तर त्याचवेळी नव्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.


         माजी जिल्हाधिकारी जी.सी. विनय गौडा यांनी आपल्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवे आयाम दिले. विविध विकास प्रकल्पांना गती देताना त्यांनी प्रशासनाला लोकाभिमुखतेची धार दिली. विशेषतः आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या विकासकामांना त्यांनी दिलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला वेग मिळाला. त्यामुळेच त्यांच्या कार्याची छाप नागरिकांच्या मनात अढळ राहिली असून, त्यांच्या सन्मानार्थ चंद्रपूरकरांनी मोठ्या कृतज्ञतेने हा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, महापौर संगीता खांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलंकीत सिंह, मनपा आयुक्त अकनूरी नरेश, पोलिस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, माजी आमदार अतुल देशकर, राजेंद्र गांधी, राहुल पावडे, प्रकाश धारणे, मंगेश गुलवाडे, विशाल निंबाळकर, नम्रता ठेमस्कर, बंडू गौरकर, पुरोषोत्तम सहारे, काशी सिंह, शिवचंद द्विवेदी, धनराज कोवे, सत्यम गाणार, चांद सय्यद, सिकंदर शेख, छबुताई वैरागडे, अंजली घोटेकर, रवी लोणकर, शुभम गेडाम, श्रीकांत आंबेकर, आकाश मस्के, सचिन यामावार, मनीषा ठुणेकर, मुग्धा खंडे, कुणाल गुंडावार, सचिन कोतपल्लिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘अक्षय तृतीया म्हणजे केवळ सोने खरेदी न करता ‘सोन्यासारखं कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान’ करणे देखील आहे. विनय म्हणजेच नम्रता, शिस्त आणि आदर, या गुणांचा संगम जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कार्यशैलीत दिसून आला,’ असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.


            चंद्रपूर जिल्ह्याने राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, यामागे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर’सारख्या उपक्रमांतून हजारो कोटींची गुंतवणूक चंद्रपुरात आली, तसेच जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी दूरदृष्टीने काम केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. प्रशासनात शांतता, संयम आणि निर्णयक्षमतेचा आदर्श त्यांनी घालून दिला, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. नव्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे स्वागत करताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण शब्दांत भावना व्यक्त केल्या. ‘वसु म्हणजे केवळ संपत्ती नव्हे, तर गुणांची श्रीमंती,’ असे सांगत त्यांनी वसुमना पंत यांच्या नेतृत्वातून चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा आणि अधिक उंची लाभेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. ‘एक सक्षम अधिकारी जातो आहे आणि दुसरा सक्षम अधिकारी येतो आहे, हीच जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे,’ असेही आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले. चंद्रपूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी राहावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन आ.मुनगंटीवार यांनी केले. ‘उत्तम काम करणाऱ्यांना समाजाची शाबासकी हीच सर्वात मोठी ऊर्जा असते,’ असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा गौरव केला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)