बल्लारपुरात भारती डुंबेरे यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी यशस्वी प्रयत्न, या विक्रम प्रयत्नात तब्बल १५ तासांत १९५ गीते सादर (Bharati Dumbere achieves a successful feat for the 'India Book of Records' in Ballarpur, performing an impressive 195 songs over a span of 15 hours during this record-breaking attempt.)
बल्लारपूर :- विदर्भातील प्रतिभावान गायिका कु. भारती डुंबेरे यांनी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याच्या उद्देशाने घेतलेला १५ तास अखंड गायनाचा संकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करत संगीत क्षेत्रात एक वेगळी छाप पाडली आहे. २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत गोंडराजे बल्लाळशाह नाट्यगृह, बल्लारपुर येथे हा विशेष उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे चार दशकांपासून संगीत क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या भारती डुंबेरे यांनी या विक्रम प्रयत्नात तब्बल १५ तासांत १९५ गीते सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या दीर्घ सादरीकरणात त्यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अल्का याग्निक, कविता कृष्णमूर्ती आणि श्रेया घोषाल यांसारख्या ख्यातनाम गायिकांची गीते सादर केली. विविध काळातील आणि विविध शैलीतील गाण्यांचा समावेश असल्याने कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनीही मोठा प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन वुमन्स पॉवर मल्टीपर्पज ऑर्गेनायझेशन, बल्लारपुर यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या अध्यक्षा पौर्णिमा टिपले व सचिव किरण भांबोरे यांच्यासह राजेश्वरी राणा, नम्रता साव, संगीता शेंडे, सुनीता टिकले, दीपा कोळणकर, आशा ढेंगळे, संध्या विघ्नेश्वर आणि रोशनी डुंबेरे यांनी दिवसभर उपस्थित राहून भारती डुंबेरे यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी नियोजनबद्ध तयारी केली होती. या विक्रम प्रयत्नासाठी भारती डुंबेरे यांनी मागील सहा महिन्यांपासून सातत्याने रियाज केल्याचे सांगितले जाते. आवाजाची ताकद, सातत्य आणि सादरीकरणातील विविधता टिकवून ठेवत त्यांनी अखंड १५ तास गायन पूर्ण केले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. दरम्यान, ग्रामीण रुग्णालय बल्लारपूरच्या डॉ. ऋचा देवनाथ यांनी अधिकृतरीत्या जाहीर केले की, भारती डुंबेरे यांनी १५ तासांत १९५ गाण्यांचे अखंड गायन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता बळावली असून बल्लारपुर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या या यशाबद्दल कौतुकाची लाट उसळली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या