छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या महसूल विषयक प्रश्नांना मिळणार दिलासा, ७ मार्च ते ८ मे दरम्यान चंद्रपूर, बल्लारपूर, मुल आणि पोंभूर्णा तालुक्यात ‘समाधान शिबिर' - आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास (Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Abhiyan will provide relief to the revenue related issues of the citizens, 'Samadhaan Shibir' will be held in Chandrapur, Ballarpur, Mul and Pombhurna talukas from March 7 to May 8 - MLA Sudhir Mungantiwar expressed confidence)

Vidyanshnewslive
By -
0
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या महसूल विषयक प्रश्नांना मिळणार दिलासा, ७ मार्च ते ८ मे दरम्यान चंद्रपूर, बल्लारपूर, मुल आणि पोंभूर्णा तालुक्यात ‘समाधान शिबिर' - आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास (Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Abhiyan will provide relief to the revenue related issues of the citizens, 'Samadhaan Shibir' will be held in Chandrapur, Ballarpur, Mul and Pombhurna talukas from March 7 to May 8 - MLA Sudhir Mungantiwar expressed confidence)


चंद्रपूर - चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील गावामध्ये ७ मार्च ते ८ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ या उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांचे महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना यातून मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. या अभियानाच्या माध्यमातून उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ, पीएम किसान नोंदणी,प्रलंबित फेरफार निकाल, ७/१२ दुरुस्ती, डिजिटल सातबारा व ८ अ उतारा तसेच महसूल संबंधित विविध डिजिटल सेवा नागरिकांना सुलभ व जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून सामान्य नागरिक, शेतकरी व गरजू घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महसूल विभाग हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. सातबारा, नमुना आठ, जमीन नोंदी, मोजणी, सीमांकन, विविध दाखले तसेच शासकीय योजनांशी संबंधित अनेक कामांसाठी नागरिकांना महसूल कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा १’ राबवून महसूल सेवा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाअंतर्गत महसूल विषयक प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करणे तसेच विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.
          या अभियानामध्ये शेतकऱ्यांसाठी डिजिटल सातबारा, ८ अ उतारे आणि सिंगल डे सर्विस डिलिव्हरी प्रणालीचा प्रभावी वापर करणे.पीएम किसान नोंदणी, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ, रेशन कार्ड वाटप उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तसेच प्रलंबित फेरफार निकाल, ७/१२ दुरुस्ती, डिजिटल सातबारा व ८ अ उतारा वितरण. अशा अनेक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून चंद्रपूर, बल्लारपूर, मुल आणि पोंभूर्णा तालुक्यात नागरिकांना विविध महसूल सेवांचा लाभ मिळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्रशासनाच्या माध्यमातून हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
          बल्लारपूर तालुक्यात शिबिर ७ मार्च २०२६ रोजी मंडळ कोठारी अंतर्गत ग्रामपंचायत कोठारी, १४ मार्च २०२६ रोजी मंडळ बल्लारपूर अंतर्गत ग्रामपंचायत विसापूर, १० एप्रिल २०२६ रोजी मंडळ कोठारी अंतर्गत ग्रामपंचायत कोठारी, १७ एप्रिल २०२६ रोजी मंडळ बल्लारपूर अंतर्गत ग्रामपंचायत विसापूर, आणि ८ मे २०२६ रोजी नगरपरिषद क्षेत्रांतर्गत तहसील कार्यालय, बल्लारपूर या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
            पोंभुर्णा तालुक्यात शिबिर १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंडळ देवाडा खुर्द अंतर्गत ग्रामपंचायत परिसर आंबेधानोरा, १० एप्रिल २०२६ रोजी नवेगाव मोरे मंडळ अंतर्गत ग्रामपंचायत सभागृह, नवेगाव मोरे. दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी पोंभुर्णा मंडळ अंतर्गत ग्रामपंचायत सभागृह, चिंतलधाबा आणि ८ मे २०२६ पोंभुर्णा मंडळ अंतर्गत राजराजेश्वर सभागृह, पोंभुर्णा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
           मुल तालुक्यात शिबिर ७ मार्च २०२६ रोजी बेंबाळ मंडळ अंतर्गत विवेकानंद महाविद्यालय बेंबाळ. १४ मार्च २०२६ रोजी चिखली मंडळ अंतर्गत माणिकादेवी मंदिर ग्राउंड, चिखली. १० एप्रिल २०२६ रोजी राजगड मंडळ अंतर्गत स्व.बापूजी पाटील हायस्कूल मैदान, राजगड. १७ एप्रिल २०२६ रोजी चिरोली मंडळ अंतर्गत महात्मा फुले शाळा, चिरोली.आणि ८ मे २०२६ रोजी मुल मंडळ अंतर्गत तहसील कार्यालय, मुल या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
            चंद्रपूर तालुक्यात शिबिर वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. ७ मार्च २०२६ रोजी अजयपुर मंडळ अंतर्गत ग्रामपंचायत सभागृह, अजयपूर. १४ मार्च २०२६ रोजी घुग्गुस मंडळ अंतर्गत स्नेहप्रभा मंगल कार्यालय,घुग्गुस. १० एप्रिल २०२६ रोजी पडोली मंडळ अंतर्गत लोकसेवा मंगल कार्यालय, पडोली. १७ एप्रिल २०२६ रोजी चिंचाळा मंडळ अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, चिंचाळा आणि ८ मे २०२६ रोजी चंद्रपूर मंडळ अंतर्गत खत्री महाविद्यालय, चंद्रपूर या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)