महानगरपालिका शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मालमत्ता कर माफ करण्यात यावा - खा. प्रतिभा धानोरकर (Property tax should be waived off for parents of students taking new admissions in municipal schools - Kha. Pratibha Dhanorkar)

Vidyanshnewslive
By -
0
महानगरपालिका शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मालमत्ता कर माफ करण्यात यावा - खा. प्रतिभा धानोरकर (Property tax should be waived off for parents of students taking new admissions in municipal schools - Kha. Pratibha Dhanorkar)

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांतील घटती पटसंख्या आणि काही शाळांवर आलेले बंद होण्याचे संकट लक्षात घेता, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महत्त्वपूर्ण मागणी पुढे केली आहे. महानगरपालिका शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मालमत्ता कर (घरपट्टी) पूर्णपणे माफ करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन त्यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे सादर केले आहे. या पार्श्वभूमीवर पालकांना करसवलतीचे प्रोत्साहन दिल्यास ते आपल्या पाल्यांना महापालिका शाळांमध्ये प्रवेश देतील आणि शाळांना नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खाजगी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे महानगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. काही शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद होण्याच्या मार्गावर असल्याची बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. 
           महानगरपालिका शाळांमध्ये प्रामुख्याने कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेतात. अशा कुटुंबांना थेट आर्थिक लाभ देणे हे प्रशासनाचे सामाजिक कर्तव्य असल्याचे खासदारांनी अधोरेखित केले. चंद्रपूर महानगरपालिकेने या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जे पालक आपल्या मुलांचा प्रवेश महानगरपालिका शाळेत निश्चित करतील, त्यांच्याकडून आकारला जाणारा वार्षिक मालमत्ता कर रद्द करण्यात यावा. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा मिळेल तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची संधी पोहोचण्यास मदत होईल. दरम्यान, या प्रस्तावामुळे शहरात सकारात्मक चर्चा सुरू झाली असून अनेक पालकांनी या भूमिकेचे स्वागत केल्याचे समजते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)