चंद्रपूरात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमा अंतर्गत जनसुनावणीमध्ये महिलांच्या 95 तक्रारींवर कार्यवाही (Action taken on 95 complaints of women in public hearing under 'Women's Commission at Your Door' initiative in Chandrapur)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमा अंतर्गत जनसुनावणीमध्ये महिलांच्या 95 तक्रारींवर कार्यवाही (Action taken on 95 complaints of women in public hearing under 'Women's Commission at Your Door' initiative in Chandrapur)

महिलांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्या – रुपाली चाकणकर

चंद्रपूर :- ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जनसुनावणीमध्ये महिलांच्या 95 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. कार्यवाही करीता 5 पॅनलचे गठन करण्यात आले होते. आजच्या जनसुनावणीमध्ये वैवाहिक / कौटुंबिक समस्यांच्या 79 तक्रारी, सामाजिक समस्यांच्या 5, मालमत्ता / आर्थिक फसवणुकीच्या 6, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळबाबत 1 तक्रार व इतर 4, अशा एकूण 95 तक्रारींवर कार्यवाही झाली. नियोजन भवन येथे पार पडलेल्या या जनसुनावणीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह सदस्य सचिव नंदिनी आवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, भागवत तांबे, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार आदी उपस्थित होते. उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करतांना श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महिलांच्या तक्रारी जागच्या जागेवर सुटाव्या, त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अनेक महिला, त्यांच्या समस्यांबाबत तक्रारी करतात, मात्र यंत्रणेकडून त्याची दखल घेतली जात नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. महिलांच्या तक्रारींबाबत कोणतीही टाळाटाळ न करता संबंधित यंत्रणेने तात्काळ दखल घ्यावी व त्याची गांभिर्याने सोडवणूक करावी. महिलांना आपल्या समस्यांबाबत मुंबईत चकरा माराव्या लागू नये, स्थानिक स्तरावरच त्यांच्या तक्रारींची सोडवणूक व्हावी, या उद्देशाने महिला आयोगच तुमच्या दारी आला आहे. भरोसा सेल, दामिनी पथकाच्या माध्यमातून पोलिस विभाग चांगले काम करीत आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी आयोगाकडे येतात. मात्र हा वाद होऊच नये, यासाठी विवाहापुर्वीच तरुण मुला-मुलींचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. हुंडाबळी कायदा अस्तित्वात असूनही हुंड्यासाठी मुलींचा छळ केला जातो. हुंडा देणारा आणि घेणारा दोघेही गुन्हेगार आहेत. आपल्या कर्तुत्वावर मुलींचे लग्न करा. त्यासाठी मुलींना चांगले शिकवा. बालविवाहाबाबतही पालकांनी सजग राहावे, असे आवाहन श्रीमती चाकणकर यांनी केले. आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे म्हणाल्या, आजच्या जनसुनावणीला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता, महिला आपल्या अधिकारांबाबत जागृत आहे, असे निदर्शनास येते. महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीच प्रत्येक जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम घेण्यात येत आहे.
      अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे म्हणाले, शासनाच्या विविध विभागांमार्फत महिलांसाठी योजना राबविल्या जातात. त्याची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून होत आहे. प्रशासनामध्ये महिलांची भागिदारी जास्तीत जास्त असावी, यासाठी. एक टीमवर्क म्हणून जिल्ह्यात काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अपर पोलिस अधिक्षक श्री. कातकडे म्हणाले, भरोसा सेल द्वारे महिलांच्या समस्या सोडविल्या जातात. तसेच महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून दामिनी पथकाद्वारे नियमित पेट्रोलिंग सुरू असते. पोलिस काका, पोलिस दिदी उपक्रमांतर्गत शाळा – महाविद्यालयांना भेटी देऊन जनजागृती केली जाते, असे ते म्हणाले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले. संचालन राणी खडसे यांनी तर आभार मोरेश्वर झोडे यांनी मानले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)